ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला सहा महिने सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:20 PM2023-03-24T20:20:00+5:302023-03-24T20:21:27+5:30
'मोबाईल नंबर दे, नाही तर दोघी जणींवर ॲसिड फेकेन' अशी द्यायचा धमकी
सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: शालेय विद्यार्थींनाचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी वाईट वर्तन केले. मोबाईल नंबर दे नाहीतर दोघीजणींवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी विक्रम उर्फ विकी राजेंद्र पोलादे (वय ३९, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी सहा महिने सक्तमजूरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी सुनावली.
खासबाग येथील खाऊ गल्ली आणि पद्माराजे शाळा ते गांधी मैदान मार्गावर १ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी विक्रम उर्फ विकी पोलादे याने एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनाचा पाठलाग केला. त्याच कुटूंबातील आणखी एका मुलीचा हात पकडून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बरेचदा पोलादे याने मुलीचा पाठलाग करून मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केली. या मागणीकडे संबधित मुलींनी दुर्लक्ष केले. त्याने रागाच्या भरात दोन्ही मुलींवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. याविरोधात मुलीच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार पोलिसांनी आरोपी पोलादे यास अटक करून न्यायालयात हजर केले. त्याच्याविरोधात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. तिडके यांच्या न्यायालत खटला सुरु होता.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी , पिडीत मुली आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी आणि जबाबा महत्वाचे ठरले. ॲड. कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयातचे निवाडे ग्राह्य मानून न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी आरोपी पोलादे यास दोषी ठरवत सहा महिने सक्तमजूरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याकामी वकील कुलकर्णी यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव, तपासी अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक टी.आर. पाटील, पैरवी अधिकारी सहायक फौजदार जर्नादन खाडे, पोलिस हवालदार अशिष पाटील, महिला पोलिस हवालदार माधवी संजय घोडके यांचे सहकार्य लाभले.