धनादेश अनादराच्या गुन्ह्यात सहा भागीदारांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 04:39 PM2018-07-31T16:39:01+5:302018-07-31T16:43:01+5:30
फ्लॅट खरेदीकरिता दिलेली आगाऊ रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याच्या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रितेश आर. मावतवाल यांनी मे. यशराज डेव्हलपर्सच्या सहा भागीदारांना प्रत्येकी सहा महिने सश्रमकारावासाची शिक्षा ठोठावली.
औरंगाबाद : फ्लॅट खरेदीकरिता दिलेली आगाऊ रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याच्या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रितेश आर. मावतवाल यांनी मे. यशराज डेव्हलपर्सच्या सहा भागीदारांना प्रत्येकी सहा महिने सश्रमकारावासाची शिक्षा ठोठावली.
आरोपींनी तक्रारदार शारदा गणपतराव बुरांडे यांना नुकसानभरपाईपोटी आदेशापासून एक महिन्यात १५ लाख रुपये द्यावेत. निर्धारित वेळेत वरील रक्कम दिली नाही, तर त्यांना प्रत्येकी सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल आणि (३१ व्या दिवसापासून) वार्षिक ९ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. खटल्याच्या खर्चापोटी तक्रारदारांना ३० हजार रुपये देण्याचाही न्यायालयाने आदेश दिला. अन्यथा १५ दिवसांचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.
तक्रारदार शारदा गणपतराव बुरांडे यांचे पती २०१४ साली एका खाजगी कंपनीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाची (ग्रॅच्युईटीची)रक्कम मिळाली होती. त्यांच्यासोबत कंपनीत काम करणारा कर्मचारी साहेबराव कापडे याने हर्सूल परिसरात मे. यशराज डेव्हलपर्स या नावाने अपार्टमेंट बांधत असल्याचे त्यांना सांगितले. बांधकामासाठी १५ लाख रुपये दिल्यास स्वस्त दरात २-बीएचके फ्लॅट देण्याचे तक्रारदारास सांगितले. साडेचौदा लाख रुपये घेऊन कापडेसह त्याचे भागीदार जाफर खान, अमिखोद्दीन, सुभाष पाटील, भाईसिंग सुरे आणि जनार्दन दौड यांनी फ्लॅट विक्रीची इसार पावती नोटरी करून दिली. उर्वरित रक्कम घेऊन सहा महिन्यांत फ्लॅटची नोंदणी (रजिस्ट्री) करण्याचे ठरले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही फ्लॅटची नोंदणी केली नाही किंवा पैसेही परत केले नाही.
तक्रारदाराने नोटीस पाठविल्यानंतर आरोपींनी त्यांना चार धनादेश दिले. त्यापैकी तीन लाख रुपयांचा एक धनादेश वटला. उर्वरित तीन धनादेश ‘अनादरित’ झाले. अनादरित धनादेशांची रक्कम १५ दिवसांत परत करण्याबाबत नोटीस देऊनही त्यांनी वेळेत पैसे परत केले नाही. म्हणून तक्रारदाराने थेट न्यायालयात तक्रार दाखल केली. अॅड. डी. एल. वकील गंगापूरकर यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली.
कापडे याने तक्रारदाराकडून १० लाख रुपये हातउसने घेतले होते. सुरक्षा हमी (सिक्युरिटी) म्हणून तक्रारदाराला स्वाक्षरी केलेले तीन धनादेश दिले होते. त्यांनी पैशांची परतफेड केल्यानंतर तक्रारदाराने वरील धनादेशांचा गैरउपयोग करून खोटा खटला दाखल केला, असा आरोपींचा बचाव होता. सुनावणीअंती न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवीत वरीलप्रमाणे आदेश दिला.