एसीबीची मोठी कारवाई! अधिकाऱ्यांसह सहा पोलीस अडकले पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 10:04 PM2020-03-14T22:04:12+5:302020-03-14T22:07:23+5:30
ऐतिहासिक कारवाई : तीन लाख मागितल्याचा गुन्हा
उमरखेड (यवतमाळ) - जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदा एसडीपीओ, ठाणेदार व सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांना लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अडकले. एसीबीच्या यवतमाळ पथकाने २९ फेब्रुवारीपासून सापळा लावला होता. शनिवारी लाचेचे ४० हजार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र एसीबी पथक असल्याची कुणकुण लागल्याने लाच स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.
उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार संजय खंदाडे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले, जमादार सुुभाष राठोड यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी मुन्ना शुक्ला, शेख मुनीर असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याची नावे आहेत. अडीच वर्षापूर्वी संस्थेच्या वादातून उमरखेडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र मॅनेज करण्यासाठी तीन लाखांची लाच मागण्यात आली होती. संबंधित व्यक्तीने एसीबी पथकाकडे पुराव्यानिशी तक्रार केली. यवतमाळच्या एसीबी पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. मोठे अधिकारी गळाला लागणार असल्याने अमरावती व वाशिम येथील एसीबी पथकाची मदत घेतली. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे तीन लाखापैकी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे पंचासमक्ष आरोपींनी मान्य केले. मात्र वेळेवर एसीबी पथक असल्याची कुणकुण लागल्याने सापळा यशस्वी झाला नाही. अखेर या प्रकरणी लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी, ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक एकाच वेळी एसीबीच्या गळाला लागले. याशिवाय जमादार व दोन कर्मचारीही या सापळा कारवाईत अडकले. एसीबीचा कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यवतमाळ एसीबीचे उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
यवतमाळ एलसीबीच्या प्रमुखालाही झाली होती अटक
जिल्हा पोलीस दलात अनेक चुकीचे प्रकार सुरू आहेत. यामुळेच आता वरिष्ठ दर्जाचे अधिकारीही लाचेच्या गुन्ह्यात अडकत असल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाला अमरावती एसीबीने अटक केली होती. त्यानंतरही पोलीस दलाचा कारभार सुधारला नाही. आता तर थेट उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी अडकल्याने संपूर्ण राज्यातच जिल्हा पोलीस दलाची बदनामी होत आहे.