बॉडी बिल्डींगसाठी हडकुळ्या चोरानं केली प्रोटिन्सची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:06 AM2018-08-29T11:06:57+5:302018-08-29T11:08:49+5:30
सीसीटीव्हीच्या आधारे तपास होऊ नये यासाठी रेकॉर्डर घेऊन चोर पसार
नवी दिल्ली : एका 20 वर्षांच्या हडकुळ्या चोरानं बॉडी बिल्डींग करण्यासाठी प्रोटिन्स लंपास केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. फक्त 35 किलो वजन असलेल्या चोराला शरीरयष्टी मजबूत करण्याची इच्छा होती. प्रोटिन्स खाऊन शरीर मजबूत होतं, असा सल्ला कोणीतरी चोराला दिला. त्यामुळे चोर त्याच्या दोन मित्रांसह एका दुकानात गेला आणि त्यानं दुकानदाराच्या डोक्यावर बंदूक रोखून लाखो रुपयांचे प्रोटिन्स लंपास केले.
प्रोटिन्सच्या चोरीप्रकरणी नॉर्थ रोहिणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरीची घटना रोहिणी सेक्टर 8 मधील प्रोटिनच्या दुकानात सोमवारी दुपारी घडली. त्यावेळी एक अतिशय हडकुळा व्यक्ती दुकानात आला. त्यानं दुकानदाराकडे प्रोटिन पावडर मागितली. दुकानात असलेल्या अंकुश यांनी त्या व्यक्तीला जिम ट्रेनरचा सल्ला घेण्यास सांगितलं. आरोपीनं वारंवार अंकुश यांच्याकडे प्रोटिन पावडर मागितली. मात्र अंकुश यांनी साफ नकार दिला. त्यामुळे आरोपी तिथून निघून गेला.
काही वेळानंतर आरोपी पुन्हा दुकानात आला आणि त्यानं पुन्हा प्रोटिन पावडरची मागणी केली. यावेळी आरोपीनं अंकुश यांना प्रोटिन पावडरच्या ब्रँडचं नाव लिहून देण्यास सांगितलं. अंकुश ब्रँडचं नाव लिहित असताना आरोपीनं त्यांचा हात मुरगळला आणि त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली. त्याचवेळी आरोपीचे दोन साथीदार दुकानात घुसले. त्यांनी लाखो रुपयांचे प्रोटिन्स घेऊन पळ काढला. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी चोरटे सीसीटीव्हीचा रेकॉर्डर घेऊन पसार झाले.