तस्करांनी महिला पोलिसाला वाहनाखाली चिरडून मारले; झारखंडच्या रांचीजवळील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:09 AM2022-07-21T08:09:34+5:302022-07-21T08:10:07+5:30
झारखंडमध्ये रांचीजवळ गुरांची तस्करी करणाऱ्या लोकांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला व्हॅनखाली चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
रांची :झारखंडमध्येरांचीजवळ गुरांची तस्करी करणाऱ्या लोकांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला व्हॅनखाली चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तुपुदानाच्या पोलीस ठाणे प्रभारी संध्या टोपनो (३२) असे या मृत उपनिरीक्षकांचे नाव आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, वाहन जप्त केले आहे. रांचीच्या तुपुदाना येथे संध्या टोपनो या वाहनांची तपासणी करत होत्या. यावेळी त्यांनी एका व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. मात्र, या व्हॅनने संध्या यांना धडक दिली. त्यानंतर चालक फरार झाला. संध्या यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांना सूचना मिळाली होती की, गो तस्कर मोठ्या प्रमाणात गुरांना व्हॅनमधून घेऊन जात आहेत. पोलिसांनी या व्हॅनचा पाठलाग केला. मात्र, बसिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांना चकवा देत हे लोक पळाले. बसिया ठाण्याने ही माहिती रांची पोलिसांना दिली. रांची पोलिसांनी तुपुदाना ठाण्याच्या हुलहुन्दूजवळ वाहन तपासणी सुरू केली. दुपारी तीन वाजता एक पांढऱ्या रंगाची व्हॅन
वेगाने आली. यावेळी पोलिसांनी या व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. पण, चालकाने वाहन महिला पोलिसाच्या अंगावर धडकविले. येथून काही अंतरावर या तस्करांना पकडण्यात आले.
गुजरात : कॉन्स्टेबलच्या अंगावर ट्रक घातला
गुजरातच्या आणंद जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एका पोलीस कॉन्स्टेबलने ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक कॉन्स्टेबलच्या अंगावर घातला. यात कॉन्स्टेबल करणसिंह राज (४०) हे गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बोरसाद शहराजवळ घडली. ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला आहे.