अंतर्वस्त्रातून केली हिरे, सोन्याची तस्करी; ६ कोटींचा ऐवज जप्त, १२ प्रवाशांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:09 AM2024-04-24T09:09:52+5:302024-04-24T09:10:20+5:30
बॅगमधील नूडल्सच्या पाकिटामध्ये २ कोटी २ लाख रुपये किमतीचे हिरे आढळून आले.
मुंबई : नूडल्सचे पाकीट, अंतर्वस्त्रातून हिरे, सोन्याची तस्करी करणाऱ्यांसह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सीमा शुल्क विभागाच्या पथकाने केली. या कारवाईत ४ कोटी ४ लाखांचे सोने व २ कोटी २ लाखांचे हिरे असा एकूण ६ काेटी ६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावरून बँकॉकला हिरे घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हिऱ्याची तस्करी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याची झडती घेतली असता बॅगमधील नूडल्सच्या पाकिटामध्ये २ कोटी २ लाख रुपये किमतीचे हिरे आढळून आले. काही महिन्यांपासून मुंबई विमानतळावरून हिरे, सोन्याची, तसेच अंमली पदार्थांची तस्करी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, याप्रकरणी आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
३२१ ग्रॅम सोने लपविले
या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाने परिधान केलेल्या अंतर्वस्त्रात ३२१ ग्रॅम सोने लपविल्याचे आढळले. याशिवाय अबुधाबी, दुबई, बहरिन, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून मुंबईत दाखल झालेल्या दहा प्रवाशांना एकूण ६ किलो १९९ ग्रॅम सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४ कोटी ४ लाख रुपये किंमत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.