चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक; पोलिसांनी कारसह एकाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 23:56 IST2024-07-20T23:53:39+5:302024-07-20T23:56:48+5:30
चार लाखाचा मुद्देमाल जप्त, बिदर-नांदेड महामार्गावरील घटना

चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक; पोलिसांनी कारसह एकाला पकडले
- राजकुमार जाेंधळे
हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला कारसह पकडण्यात आल्याची घटना बिदर-नांदेड महामार्गावर वायगाव पाटी येथे पहाटे घडली. याबाबत वाढवणा (बु.) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) ठाण्याचे पोलिस कर्मचारी बुधवारी मध्यरात्री गस्तीवर होते. दरम्यान, उदगीर येथून एका कारमधून अहमदपूरच्या दिशेने गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वाढवणा आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी कारचा पाठलाग केला.
अहमदपूरच्या दिशेने निघालेली भरधाव कार बिदर-नांदेड महामार्गावरील वायगाव पाटीनजीक आली. यावेळी कारचालकाने महामार्गावरील कठड्याला धडक देत कार थांबविली आणि चालक पसार झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली, अशी माहिती सपोनि. भीमराव गायकवाड यांनी दिली.
पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात गुटखा (किंमत १ लाख ८० हजार ९६० रुपये) आढळून आला. शिवाय, जुन्या वापरातील कार (एम.एच.१२ एन.एक्स. २८२१) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गुटख्यासह कार असा ४ लाख ३० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.