अंगावरील कपड्यांमधून केली ५२ जिवंत साप अन् सरड्यांची तस्करी; अमेरिकेतील अजब प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:43 AM2022-03-15T09:43:19+5:302022-03-15T09:43:26+5:30
पशुपक्ष्यांच्या अवैध विक्रीतून बक्कळ पैसा
वाॅशिंग्टन : सोने, अमली पदार्थांची शरीरात, बॅगेतील चोरकप्प्यात लपवून तस्करी केल्याची अनेक उदाहरणे आहेत, मात्र मेक्सिकोची सीमा ओलांडून अमेरिकेत प्रवेश केलेल्या एका माणसाने आपल्या कपड्यांमध्ये चक्क दुर्मीळ जातीचे ५२ जिवंत साप व सरडे लपवून आणले होते. तस्करीचा हा आगळावेगळा प्रकार पाहून अमेरिकेचे कस्टम अधिकारीही चक्रावून गेले. पशुपक्ष्यांच्या अवैध विक्रीतून तस्कर बक्कळ पैसा कमावतात.
मेक्सिकोतून ट्रक घेऊन अमेरिकेत आलेल्या चालकाची कस्टम अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता, त्याच्या जॅकेट, पँटच्या खिशांमध्ये ठेवलेल्या ५२ छोट्या आकाराच्या पिशव्यांमध्ये ४३ जिवंत सरडे व ९ साप आढळून आले. प्राण्यांची अमेरिकेत तस्करी होण्याचे प्रकार नेहमीच होत असतात, मात्र जिवंत प्राण्यांना कपड्यांमध्ये लपवून तस्करी करण्याची कल्पना त्या ट्रकचालकाशिवाय याआधी कोणाला सुचली नव्हती. पिशव्यांमध्ये बराच काळ बंदिस्त राहिल्याने साप, सरडे हे अर्धमेले झाले होते. त्यांच्यावर तत्काळ प्राणितज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले. या ट्रकचालकाला अमेरिकेच्या कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. (वृत्तसंस्था)
पोपटांच्या तस्करीसाठी नदी मार्गाचा वापर
अमेरिका व मेक्सिकोला लागून असलेल्या सीमाभागात एक नदी आहे. दुर्मीळ जातीचे २५ पोपट अमेरिकेत चोरट्या पद्धतीने आणले जाणार होते. हे पोपट असलेल्या पिंजऱ्याची पेटी मेक्सिकोच्या हद्दीतून या नदीत सोडण्यात आली. ही पेटी तरंगत ठेवण्यासाठी तस्करांनी टायरच्या आतील नळ्यांचा खुबीने वापर केला होता.
दुर्मीळ जातीचे पक्षी, माकडे, श्वान यांची पिल्ले, अशा विविध प्रकारच्या प्राण्यांची तस्करी लॅटिन अमेरिकेतील देशांतून अमेरिकेत केली जाते. वन्यप्राण्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी असली तरी अमेरिकेत हे प्राणी छुप्या पद्धतीने विकत घेणारे शौकीन आहेत. त्यासाठी ते काही हजार डॉलरही मोजायला तयार असतात.