प्लास्टिक कचऱ्याच्या आड गुटख्याची तस्करी पकडली; एसीबीची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: March 27, 2023 06:02 PM2023-03-27T18:02:33+5:302023-03-27T18:03:14+5:30
दहिवेल शिवारात एलसीबीची कारवाई, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे : प्लास्टिक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठ्याआड होणारी गुटख्याची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. साक्री तालुक्यातील दहिवेल शिवारात ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी करण्यात आली. एमएच ४१ जी ७१६५ क्रमांकाचा ट्रक हा सुरत येथून निघून साक्री-धुळे मार्गे मालेगावच्या दिशेने जात आहे. त्यात गुटखासदृश पदार्थ असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार, पथकास रवाना करण्यात आले होते.
दहिवेल चौफुलीवर रविवारी सापळा लावण्यात आला. संशयित ट्रक येताच पथकाने ट्रक थांबविला. चालकाकडे विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ट्रकसह चालकाला ताब्यात घेण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता त्यात प्लास्टिक कचरा व कपड्यांमध्ये ९८ हजार ४०० रुपयांचा विमल सुगंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला. त्यासह १० लाखांचा ट्रक, ५ हजाराचा मोबाइल, १ लाख १५ हजाराचा प्लास्टिक कचरा व कपड्यांचे गठ्ठे असा एकूण १२ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक चालक शेख असलम शेख उस्मान (वय ४३, रा. न्यू आझादनगर, गल्ली नंबर ५, मालेगाव) याला अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास साक्री पोलिस करीत आहेत.