ऑन आर्मी ड्युटीचे फलक लावून तंबाखुची तस्करी, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By देवेंद्र पाठक | Published: June 12, 2023 05:03 PM2023-06-12T17:03:20+5:302023-06-12T17:03:59+5:30
दिल्ली येथून निघालेल्या एका कंटेनरमध्ये सुंगधीत तंबाखू लपविलेला असून, ती केरळ राज्यातील कोची येथे रवाना करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.
धुळे : ऑन आर्मी ड्युटीचे फलक लावून लोखंडी चॅनेलच्या ट्रेमध्ये लपवून सुंगधीत तंबाखूची होत असलेली तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनगीरनजीक रविवारी दुपारी पकडली. यात कंटेनरसह १३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला असून, चालकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली येथून निघालेल्या एका कंटेनरमध्ये सुंगधीत तंबाखू लपविलेला असून, ती केरळ राज्यातील कोची येथे रवाना करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.
माहिती मिळताच मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीरनजिक हॉटेल न्यू सदानंदजवळ पथकाने सापळा लावला. रविवारी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास युपी ८३ सीटी ५८७७ क्रमांकाचा कंटेनर आल्यानंतर थांबविण्यात आला. कंटेनरच्या अग्रभागी ऑन आर्मी ड्युटी असे फलक लावण्यात आले होते. चालकाकडे विचारणा केली असता कंटेनरमध्ये लोखंडी चॅनलचे ट्रे असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना संशय आल्याने कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात लोखंडी ट्रेच्या अडोशाला सुंगधीत तंबाखूचा अवैध साठा लपविलेला आढळून आला.
पोलिसांनी १ लाख ८ हजार रुपये किमतीचा सुंगधीत तंबाखूचा साठा, २ लाख ८० हजार रुपयांची लोखंडाचे चॅनेल ट्रे आणि १० लाखांचा कंटेनर असा एकूण १३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बबलू रामप्रकाश प्रजापती (वय २७, इमलियाडांग, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. अन्न व औषध अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, सुनील पाटील, मयुर पाटील, अमाेल जाधव यांनी ही कारवाई केली.