रत्नागिरीत ६ कोटी किंमत असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:25 PM2022-05-18T12:25:32+5:302022-05-18T12:25:42+5:30
लखनौमधील एका व्यक्तीसह एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली आहे.
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ६ कोटी रुपये किंमत असून, पावणेसहा किलो वजनाची ही उलटी आहे. ही कारवाई रत्नागिरी शहरानजिकच्या उद्यमनगर चंपक मैदानाजवळ करण्यात आली.
यामध्ये लखनौमधील एका व्यक्तीसह एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली आहे. संगमेश्वरनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत मोठ्या किंमतीची उलटी जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात तस्करी करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना होता. अखेर सोमवारी रात्री दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी उद्यमनगरनजिकच्या चंपक मैदानाजवळ दोघेजण व्हेल माशांच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चंपक मैदानशेजारी सापळा लावाला होता. सोमावारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोनजण तेथे आले.
काही वेळ ते कोणाची तरी वाट पाहात थांबले होते. याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे पावणेसहा किलो वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीचे सफेत रंगाचे तुकडे आढळले. त्यानंतर त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीसांनी महम्मद जाहिर सय्यद महम्मद अत्तार (वय ५६, रा. सध्या राजापूरकर काॅलनी, उद्यमनगर, मूळ रा. लखनौ), हमीब सोलकर ( रा. लाला काॅम्प्लेक्स, रत्नागिरी) या दोघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्थानकात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहय्यक पोलीस उपनिरिक्षक महेश टेंमकर करीत आहेत.