अवैधरित्या किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी सर्प इंडियाचा सदस्य ताब्यात
By अनंत खं.जाधव | Published: September 25, 2022 07:18 PM2022-09-25T19:18:50+5:302022-09-25T19:19:16+5:30
चित्रानंद पेडणेकर ( 40 ) असे नाव आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला संशयित पेडणेकर हा सर्प इंडिया या मुंबईस्थित संस्थेचा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामधून अवैधरित्या किंगकोब्रा प्रजातीचा दुर्मिळ साप ताब्यात ठेवल्याप्रकरणाचे धागेदोरे मुंबई पर्यत पोचले असून या प्रकरणी दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यालयाने मुंबई येथून सर्प इंडिया संस्थापक सदस्य चित्रानंद पेडणेकर याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अटक झालेल्याची संख्या दोन झाली आहे. याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामधून अवैद्य रित्या किंगकोब्रा प्रजातीचा दुर्मिळ साप ताब्यात ताब्यात ठेवल्या प्रकरणात यापूर्वी दोडामार्ग येथे राहणाऱ्या राहुल निरलगी याला ताब्यात घेण्यात आले. मात्र यातील अन्य एक संशयित फरार असल्याने त्याचा शोध घेण्यात आला त्याला वारंवार चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले मात्र तो उपस्थित न राहिल्याने अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले.
चित्रानंद पेडणेकर ( 40 ) असे नाव आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला संशयित पेडणेकर हा सर्प इंडिया या मुंबईस्थित संस्थेचा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते. ही कारवाई उपवनसंरक्षक दीपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दोडामार्ग मदन क्षीरसागर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, फिरते पथकचे पोलीस कॉन्स्टेबल गौरेश राणे व वाहनचालक रामदास जंगले यांनी केली.
वनविभागाकडून आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सापांच्या रेस्क्यूसाठी काम करणाऱ्या तरूणांनी वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन सापांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे व रेस्क्यू केलेला साप वनविभागाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात मुक्त करावा. अवैधरित्या साप बाळगू नयेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना हाताशी धरून काही बाह्य संस्था वा व्यक्ती सापांच्या वा इतर कोणत्याही वन्यजीवांच्या तस्करी वा व्यापारात गुंतलेल्या असतील तर त्यांना बळी न पडता वनविभागाशी संपर्क साधावा व गुन्हे रोखण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले आहे.