हातातील मोबाईल हिसकावून धारदार शस्त्राने वार; चोरट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:04 PM2022-04-12T16:04:36+5:302022-04-12T16:05:09+5:30
Mobile Snatching Case : मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तैनात केले आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ पंजाबी कॉलनीत राहणारे मुन्नीलाल जसवार हे शनिवारी पहाटे ५ वाजता शौचास रस्त्याने जात असतांना त्यावेळी मोटरसायकल वरून आलेल्या दोघा पैकी एकाने यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मुन्नीलाल यांचा सोमवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तैनात केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील पंजाबी कॉलनीत मुन्नीलाल जसवार कुटुंबासह राहतात. शनिवारी सकाळी सव्वा पाच वाजता ते महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात शौचास जात होते. त्यावेळी मोटरसायकल वरून आलेल्या दोघा पैकी एकाने मुन्नीलाल यांच्या हातातील मोबाईल हिसकावून डोक्यावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करून पळून गेले. रक्ताच्यां थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या मुन्नीलाल यांना नागरिकांनी उपचारासाठीं मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तब्येत गंभीर झाल्याने एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर शनिवारी रात्री उशिरा त्यांना मुंबई रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असून मध्यवर्ती पोलिसांनी मुन्नीलाल यांचा मुलगा पवनकुमार जसवार याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. नेमका मोबाईल हिसकविण्यासाठी हल्ला केला की त्यामागे इतर कारण आहे. याबाबतचा तपास पोलिश करीत होते.
दरम्यान मुन्नीलाल यांची तब्येत गंभीर होऊन मुंबईच्या रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. याप्रकारने मोबाईल चोरांच्या पोलीस मुसक्या आवळणार की नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांचा धाक न राहिल्याने, शहरात गुन्ह्याच्या घटनेत वाढ झाल्याची टीका पोलिसांवर होत आहे. मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी तीन पथके तैनात केली असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने, पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.