अब तक १०० पार... सराईत गुन्हेगार ठरला सामान्य नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी

By मनीषा म्हात्रे | Updated: January 16, 2025 09:09 IST2025-01-16T08:43:51+5:302025-01-16T09:09:49+5:30

पोलिसांनी ९१ वेळा त्याच्या मुसक्या आवळून गजाआडसुद्धा केले. पण, जामिनावर बाहेर पडताच तो पुन्हा नवीन सावज शोधतो. 

So far 100 times... Criminal Naresh Jaiswal has become a headache for the police along with the common citizens. | अब तक १०० पार... सराईत गुन्हेगार ठरला सामान्य नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी

अब तक १०० पार... सराईत गुन्हेगार ठरला सामान्य नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी

- मनीषा म्हात्रे

मुंबई : कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या एखाद्याच्या पाठीवर अचानक थाप पडते. अरे, ओळखलं नाहीस का? किंवा पहचाना नाही? मी रमेश.. सुरेश.. किंवा मै अक्रम.. अशी अगदी ओळखीची नावे सांगून संवाद सुरू होतो. पुढे, बोलण्यात गुंतवून हाच तोतया हातचलाखीने किमती ऐवजावर हात साफ करून परागंदा होतो. अब तक १०० पार... गुन्हे केलेला पोलिस अभिलेखावरील सराईत बोलबच्चन गुन्हेगार नरेश जयस्वाल (४४) हा सामान्य नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी ठरला आहे. पोलिसांनी ९१ वेळा त्याच्या मुसक्या आवळून गजाआडसुद्धा केले. पण, जामिनावर बाहेर पडताच तो पुन्हा नवीन सावज शोधतो. 

मूळचा चेंबूरचा रहिवासी असलेल्या नरेश विरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत गुन्हे नोंद आहेत. कारागृहातून सहा महिन्यांनी तो बाहेर पडला. २२ डिसेंबर रोजी त्याने मानखुर्दमध्ये रमेश पोळ यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. मानखुर्द पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला.

तपासात २०१९ मध्ये अटक केलेला नरेश जयस्वालच असल्याचे स्पष्ट होताच, त्यांनी शोध सुरू केला. तो सतत लोकेशन बदलत होता. कल्याण, उल्हासनगर, वाशी, बेलापूर अशा विविध लॉजमध्ये थांबून तो लपत होता. अखेर, गुप्त माहितीदारांच्या मदतीने त्याला मानखुर्दमधून बेड्या ठोकल्या. त्यावेळीही त्याने पथकावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

गंभीर आजाराची त्यांनाही भीती...
अटक केल्यानंतर गंभीर आजाराचा फायदा घेत अधिकाऱ्यांवर थुंकणे, जीभ चावून रक्ताची थुंकी अंगावर टाकण्याची धमकी देणे, तेथेच शौच करण्यासारखे प्रकार करून तो तपासाला सहकार्य करत नाही. 

बार गर्ल्स अन् नशा 
बार गर्ल्ससह नशेचा नाद असल्याने ठगीचे पैसे त्यात उडवत होता. ओळखीच्या व्यक्तीसह सोनारालही घरातील मंडळी आजारी असल्याचे सांगून या वस्तू मार्गी लावतो.

जामिनावर येताच पुन्हा गुन्हा
सहा महिन्यांनी कारागृहातून जामिनावर बाहेर पडून त्याने दुसरा गुन्हा केला. त्याला अटक झाल्यानंतर त्याची पत्नी त्याला बाहेर काढते. त्याचा भाऊ रमेश हा देखील महाठग असून त्याच्याविरुद्धही ८ ते १० गुन्ह्यांची नोंद आहे. तोही सध्या कारागृहात आहे.

पण मुलांना शिकवलं...
त्याचा मुलगा डिप्लोमा तर मुलगी दहावीचे शिक्षण घेत आहे. दोघेही आईसोबत राहतात. नरेश मानखुर्दमध्ये भाड्याच्या घरात राहायचा.

जयस्वाल विरुद्ध २०१० पासून गुन्ह्यांची नोंद आहे. १०० हून अधिक गुन्हे त्याच्या विरुद्ध नोंद आहेत. यापैकी ९१ वेळा अटकही झाली. जामिनावर बाहेर पडताच तो दुसरा गुन्हा करायचा. सध्या त्याच्या या वृत्तीमुळे त्याचा जामीनही नाकारला आहे. त्यामुळे तुमच्याही पाठीवर अशी अनोळखी थाप पडल्यास वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे मानखुर्द पोलिसांनी सांगितले. 

Web Title: So far 100 times... Criminal Naresh Jaiswal has become a headache for the police along with the common citizens.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.