म्हणून मुलीच्या वडिलांनीच केली तिच्या प्रियकराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:16 AM2021-11-29T09:16:35+5:302021-11-29T09:16:58+5:30
Crime News: हासनाळ (प. मु.) येथील युवकाच्या हत्येचा एक महिन्याने उलगडा झाला आहे. या युवकाचा त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मुक्रमाबाद (जि. नांदेड) : हासनाळ (प. मु.) येथील युवकाच्या हत्येचा एक महिन्याने उलगडा झाला आहे. या युवकाचा त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सूर्यकांत नागनाथ जाधव (२२) असे मयताचे नाव आहे. माधव थोटवे व पंढरी गवलवाड अशी आरोपींची नावे आहेत.
मयत सूर्यकांत याचे गावातीलच त्याच्या नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना समजल्याने सूर्यकांत जाधव याने गाव सोडले, पण चार महिन्यांनंतर पुन्हा तो ३१ ऑक्टोबर रोजी गावाकडे येत होता. तो येत असल्याची माहिती आरोपी माधव यांना मिळताच त्यांनी मेहुणे पंढरीसोबत सूर्यकांतला गाठले आणि रावणगाव शिवारातील शेतात नेऊन त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह खोल खड्डा करून पुरून पुरावा नष्ट केला. सूर्यकांतचा संपर्क होत नसल्याने त्याचा भाऊ रविकांत जाधव यांनी मुक्रमाबाद पोलिसांत ८ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची
चक्रे जलद गतीने फिरवून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना मुखेड कोर्टासमोर हजर केले असता १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.