...म्हणून पतीने पत्नीचा आवळला गळा अन् मृतदेह टाकून दिला नाल्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:43 PM2020-02-13T18:43:29+5:302020-02-13T18:45:24+5:30
आरोपीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे.
आग्रा - उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे एका नाल्यात १० दिवसांपूर्वी एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी जिपेंद्रसिंग उर्फ भूपेंद्र याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. आरोपीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे.
उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे पोलिसांनी एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली मंगळवारी अटक करण्यात आली आहे. एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह १० दिवसांपूर्वी नाल्यात सापडला होता. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव लाखी जाटव असं आहे. तिचा नवरा जिपेंद्रसिंग उर्फ भूपेंद्र याने पत्नी त्याच्या पगारातील पैसे हे आपल्या नातेवाईकांवर खर्च करत असल्याचा रागातून पत्नीची गळा आवळून हत्या केली.
२०१५ साली जिपेंद्रसिंह आणि लाखी यांनी आंतरजातीय विवाह केला. कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरूद्ध लग्न केले असल्याने मुलाचे आई - वडिल मुलासोबत राहत नव्हते. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना एक मुलगीही झाली. पत्नीने पतीला तिच्या आई - वडील राहत असलेल्या अलिगढ येथे राहण्यास जाण्यासाठी आग्रह केला. या आग्रहास्तव लग्नानंतर दोघेही अलीगढच्या गोकुलेशपुरम कॉलनीत राहण्यासाठी गेले होते. येथे ते भाड्याच्या घरात राहत होते. भूपेंद्र हा एका खासगी कंपनीत कामाला होता. दरम्यान, त्याची पत्नी ही त्याची असणारी प्रॉपर्टी विकून अलीगढच्या मुख्य शहरात घर घेण्यासाठी त्याच्यावर सतत सांगत असे.
भूपेंद्रला काही दिवसांनी लाखी ही त्याच्या पगारातील मोठी रक्कम तिच्या नातेवाईकांवर खर्च करते असं कळालं. या गोष्टीचा त्याला खूप राग आला. यावरुन दोघांमध्ये भांडणाचे खटके उडू लागले. अखेर ३० जानेवारीला तो पत्नी आणि मुलीला अलीगढ येथे घेऊन गेला आणि रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह नाल्यात फेकला. १० दिवसांनी महिलेचा मृतदेह नाल्यात सापडल्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली. भूपेंद्रच्या इतर नातेवाईकांचाही सहभाग असण्याला संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी लाखीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.