अति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 07:58 PM2018-10-19T19:58:17+5:302018-10-19T19:58:42+5:30
वाडा येथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका वाहनात नाराणय सेवक (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. मृत नाराणय सेवक हा सराईत चोर होता. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ११ ऑक्टोबर रोजी सायन येथील काजल ज्वेर्सल या दुकानात चोरी केली होती.
वसई - सायन परिसरातील काजल ज्वेलर्स दुकानातून १ कोटी रुपयांचे दागिने चोरी करुन फरार झालेल्या एका तरुणाला अधिक पैशाच्या मोहापायी आपला जीव गमवावा लागला आहे. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणातातून मुंबईच्या सराफाच्या दुकानातील १ कोटींच्या चोरीचाही छडा देखील लागला आहे.
वाडा येथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका वाहनात नाराणय सेवक (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. मृत नाराणय सेवक हा सराईत चोर होता. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ११ ऑक्टोबर रोजी सायन येथील काजल ज्वेर्सल या दुकानात चोरी केली होती. नारायण सेवक याला त्याच्या वाटेतील २ किलो सोने मिळाले होते. ते सोने घेऊन तो वसईतील आपल्याच गावातील परिचित मदनलाल सेवक (वय २८) आणि श्रवण सेवक (वय १९) या भावांकडे आला होता. त्याच्याकडे दोन किलो चोरीचे सोने होते. परंतु तो मदनलालला ब्लॅकमेल करण्यासाठी आला होता. मदनलाल याने दुसरे लग्न केले होते. ते लपवून ठेवण्यासाठी तो मदनलालकडे पैसे मागत होता. त्यामुळे या दोघा भावांनी त्याची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गाडीत टाकून वाडा येथील जंगलात नेत होते. त्याचवेळी नाकाबंदीत पोलिसांना या गाडीत मृतदेह आढळला.
माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून मदनलाल आणि सेवक या दोन्ही भावांना अटक केली. त्यांनी घरात आणि गोदामात दडवून ठेवलेले ४५ लाख रुपयांचे सोनेही हस्तगत केले आहे. याबाबत बोलताना माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी भाऊ मृतदेह नष्ट कऱण्यासाठी जंगलात नेत होते. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि आम्ही पुढील तपास केला. अनैतिक संबंधामुळे मृत नारायण हा मदनलालला ब्लॅकमेल करत होता म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी दोघा भावांनी मिळून हत्या केली आहे. परंतु आम्ही सखोल तपास करत आहोत. मृत नारायणने काजल ज्वेलर्समधून चोरलेले सोने लंपास करण्याच्या हेतूने हत्या केली असावी अशीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.