...म्हणून पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घालून केला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:42 PM2020-01-21T21:42:02+5:302020-01-21T21:44:18+5:30
ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.
चंदीगड - सिंघम म्हणून ओळख असलेल्या डीएसपी अतुल सोनी या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पंजाब पोलिसांत हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) आणि घरगुती हिंसाचार (कलम ४९८ - अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने रागाने सोनीने आपली पत्नी सुनीता सोनी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही. दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने डीएसपी सोनी इतका संतप्त झाला की त्याने पत्नीवर गोळी झाडली. मात्र, यात पत्नी थोडक्यात बचावली. झाडलेली गोळी डोक्याच्या वरच्या बाजूस गेली त्यामुळे पत्नीचा जीव वाचला. चंदीगड येथे शनिवारी सायंकाळी एका पार्टीसाठी सोनी पती - पत्नी गेले होते. तेथे दोघांत भांडण झाल्याने दोघे वेगवेगळ्या वाहनांनी घरी परतले होते असल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली.
मोहाली येथील सेक्टर ६८ मधील युनाइटेड कोऑपरेटिव्ह सोसायटीत हे पती - पत्नी राहतात. हल्ल्यानंतर डीएसपीच्या पत्नीने मोहाली पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतुल सोनीने त्याच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरवरून नव्हे तर बेकायदेशीर रिव्हॉल्व्हरवरून गोळी चालविली असल्याचा आरोप आहे. सोनीच्या पत्नीनेही या घटनेत वापरलेली शस्त्रे आणि काडतुसे पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. अतुल सोनी सध्या फरार आहे. जुन्या रेकॉर्डवरून अतुल सोनीने बर्याच पंजाबी चित्रपट आणि व्हिडिओमध्येही काम केले आहे आणि बॉडी बिल्डिंगमध्येही पंजाब पोलिसांचा लोकप्रिय चेहरा आहे. यापूर्वीही बर्याचदा तो वादात अडकला होता. जून २०१२ मध्ये त्याला दिल्ली विमानतळावर शस्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. मार्च २०१३ मध्ये सोनीविरोधात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी मार्चमध्ये सोनीच्या मुलाला रोड अपघाताच्या प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या कारनेच एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.