...म्हणून पत्नीनेच आवळला पतीच्या प्रेयसीचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 08:26 AM2022-10-09T08:26:37+5:302022-10-09T08:27:02+5:30
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीतून नाल्यात, कुर्ला येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून २५ वर्षीय पत्नीनेच बहीण आणि मैत्रीणीच्या मदतीने पतीच्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्याची खळबळजनक घटना कुर्ला येथे घडली आहे. या हत्याकांडाची उकल करत नेहरूनगर पोलिसांनी तिन्ही महिलांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेहरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बंदर भवनासमोरील नाल्यात एक संशयास्पद गोणी पडल्याचा संदेश प्राप्त झाला. नेहरूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोणीची तपासणी केली. त्यात एका महिलेचा कुजलेला मृतदेह त्यांना आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कुर्ला पूर्वेकडील नवजीवन रहिवासी संघ येथून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी मीनल पवार (२५) हिने तिच्या पतीचे मृत महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून बहीण शिल्पा पवार (२५) आणि मैत्रीण प्रज्ञा उर्फ डॉली भालेराव (२५) यांच्या मदतीने कट रचून मृत महिलेची १ ऑक्टोबरच्या पहाटे अडीज वाजता हत्या केली.
असा रंगला हत्येचा थरार...
प्रेम संबंधाच्या रागातून मीनलची मैत्रीण डॉली हिने प्रेयसीला माहुल गाव येथील घरी घरी ठेवले. त्यानुसार, ३० सप्टेंबर रोजी मीनल तिची बहीण शिल्पा पवारने डॉलीचे घर गाठले. तिघींनी त्या महिलेला इमारतीच्या टेरेसवर नेऊन दोन्ही हात पकडून, केस ओढून, तिला मारहाण केली. शिल्पा हिने तिचा स्कार्प काढून मीनलकडे दिला. मीनलने स्कार्फच्या सहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा जीव गेल्याची खात्री झाल्यावर तिला एका गोणीतून डॉलीच्या घराच्या जवळून खेचतच रिक्षातून नाल्यात फेकला.