...म्हणून तरुणाने साैदी अरेबियाच्या दूतावासाला पाठवले धमकीचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:08 AM2020-11-20T07:08:25+5:302020-11-20T07:08:54+5:30
कफपरेड पोलिसांनी केली अटक : लग्नासाठी नकार दिल्याचा राग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लग्नासाठी नकार देणाऱ्या तरुणीला धडा शिकविण्यासाठी एका उच्चशिक्षित तरुणाने तिच्या नावाने थेट सौदी अरेबियाच्या दूतावासाला बॉम्बने उडविणार असल्याचे धमकीचे पत्र पाठविल्याचे कफपरेड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले. सुजीत राम गिडवानी (४७) असे अटक आरोपीचे नाव आहे.
गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया दूतावासाला बॉम्बने उडविणार असल्याचे धमकीचे पत्र आले. तसेच पत्र वर्सोवातील एका शाळेलाही आले. यात संबंधित महिलेचा नाव आणि पत्ता होता. दूतावास कार्यालयाने कफपरेड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेचे नाव, पत्त्यावरून महिलेचा शोध घेतला. तिच्या चौकशीत गिडवानीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले.
चाैकशीत दिली गुन्ह्याची कबुली
गिडवानी हा लोखंडवाला येथे आईसोबत राहण्यास आहे. तो उच्चशिक्षित आहे. मात्र तरीही त्याला लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. गिडवानीची संबंधित महिलेसोबत डेट ॲपवरून ओळख झाली. मात्र संबंधित महिलेने लग्नास नकार दिल्याच्या रागात गिडवानीने त्या महिलेच्या नावाने धमकीचे पत्र पाठविल्याची कबुली त्याने पाेलीस चाैकशीत दिली. त्यानुसार बुधवारी त्याला अटक झाली.