ग्रामसभेत राडा... तक्रार देऊन परतताना सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:10 PM2022-12-31T13:10:18+5:302022-12-31T13:11:04+5:30

शुक्रवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत वादावादी झाली. यावेळी इघे यांना मारहाण झाली. तसेच धमकी देण्यात आली

Social worker assaulted while returning from complaint in ahmednagar, FIR Lodged | ग्रामसभेत राडा... तक्रार देऊन परतताना सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

ग्रामसभेत राडा... तक्रार देऊन परतताना सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

googlenewsNext

घारगाव ( जि. अहमदनगर) : ग्रामसभेत झालेली मारहाण व धमकीची घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरी परतत असताना अज्ञात वाहनांतून आलेल्या टोळक्याने संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल नामदेव इघे या तरूणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि.३०) रात्री १० वाजेच्या सुमारास हिवरगाव पठार भागात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.         

शुक्रवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत वादावादी झाली. यावेळी इघे यांना मारहाण झाली. तसेच धमकी देण्यात आली. याप्रकरणी इघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर बाजार समितीचे माजी सभापती शंकर हनुमंत खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजित अशोक खेमनर यांच्यासह अनमोल शंकर खेमनर,हर्षद शंकर खेमनर, रफिक अब्दुल चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार,ग्रामसेवक नागेश पाबळे आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ग्रामसचिवालय साकुर येथे  ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेस ग्रामसभेस ग्रामसेवक, पदाधिकारी यांसह नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य व १५० ते २०० ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. त्यावेळी ग्रामस्थांचे वतीने विघे यांनी जोगेपठार येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत नसलेबाबत ग्रामसेवक पाबळे यांना प्रश्न केला असता बाजार समितीचे माजी सभापती शंकर खेमनर म्हणाले, तुझा येथे बोलण्याचा काही एक संबंध नाही, तू खाली बस असे ते म्हणाले. त्यावेळी विघे त्यांना समजावून सांगणेस गेले की, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. हा माझा वैयक्तीक प्रश्न नाही तो जनतेचा हक्क आहे. असे बोलण्याचा राग आल्याने विघे यांना शंकर खेमनर,  इंद्रजीत खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर, रफिक चौगुले,आबा वाकचौरे,गणपत पवार, ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आमचे विरुध्द आवाज उठवला तर तुला कायमचा संपवून टाकीन. आमचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही ग्रामसेवकाकरवी गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.       

दरम्यान , फिर्याद देऊन विघे त्यांच्या दोन मित्रांसह घरी परतत असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हिवरगाव पठार येथे आले असता अचानक अज्ञात वाहनांमधून आलेल्या टोळक्याने अचानक हल्ला चढविला. इघे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एका मित्राचा मोबाईल या टोळक्याने हिसकावून घेतले व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या गडबडीत यातील त्यांच्याबरोबर असलेला दुसरा मित्र सटकला व तो घटनास्थळावरून गायब झाला. दूर गेल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर चक्रे फिरल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे, नामदेव बिरे, होमगार्ड मोहम्मद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच हे टोळके पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या इघे यांना संगमनेर येथे उपचारासाठी पाठविले.

Web Title: Social worker assaulted while returning from complaint in ahmednagar, FIR Lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.