Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील

By Appasaheb.patil | Published: December 18, 2022 06:06 PM2022-12-18T18:06:57+5:302022-12-18T18:07:27+5:30

सोलापूर शहरातील कारवाई, १० आरोपींसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Solapur Crime | Manufacture of fake toddy in paper shed, factory seal by raid | Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील

Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील

Next

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील घोंगडे वस्ती परिसरात एका बनावट ताडी निर्मिती कारखान्यावर धाड टाकून शुद्ध ताडीपासून बनावट ताडी तयार करणा-या १० आरोपींसह १२ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती भवानी पेठ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून नैसर्गिक ताडी वापरून त्यामध्ये विविध केमिकलयुक्त पदार्थ टाकून कृत्रिमरित्या भेसळयुक्त ताडीची निर्मिती करीत असतांना १० लोकांना ताब्यात घेतले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली त्यावेळी त्याठिकाणी एका १ हजार लिटर क्षमतेच्या निळ्या रंगाच्या टबमध्ये व एका १ हजार लिटर क्षमतेच्या काळ्या रंगाच्या टबमध्ये बनावट ताडीचा साठा तयार केला जात असल्याचे दिसून आले.

तसेच त्याठिकाणी ५० लिटर क्षमतेच्या २९ कॅनमध्ये शुद्ध ताडी व ३० प्लास्टिक कॅरेटमध्ये ६५० मिलीच्या ताडीने भरलेल्या ३६० बाटल्यांचा साठाही आढळून आला. यासह सदर गुन्ह्यात रिकाम्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कॅरेट, प्लास्टिक टब, बनावट ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल व इतर साहित्य तसेच एक महिंद्रा बोलेरो वाहन क्र. एमएच १३ डीक्यू २८४६  दोन दुचाकी वाहने इत्यादी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये १२ लाख १७ हजार दोनशे चौतीस इतकी आहे. सदर गुन्ह्यात शिवय्या राजय्या तांडा, माणिकगौड शंकरगौड पोगुल, अंबादास नरसप्पा बिच्चल, आकाश दत्तात्रय माने, अंबादास सिद्राम इदनुर, मदन मोहन पात्रे, रोहन सुधाकर जगताप, विकास दत्तात्रय माने, अंबादास दिगंबर जगताप, नरेंद्र लक्ष्मीकांत उदगिरी यांना अटक करण्यात आली असून दहाही आरोपींना १८ डिसेंबर रोजी दारुबंदी न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना एका दिवसाची एक्साईज कस्टडी मंजूर केली आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक सुरेश राजगडे, अंकुश आवताडे, सुरेश झगडे, सुनिल पाटिल, गणेश उंडे, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, सिद्धराम बिराजदार, जवान प्रियंका कुटे, अनिल पांढरे, प्रकाश सावंत, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, चेतन व्हनगुंटी व वाहनचालक रशिद शेख, रामचंद्र मदने, संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.

सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या ताडी व इतर केमिकल पदार्थांचे नमूने काढण्यात आले असून रासायनिक लॅबोरेटरीकडे चाचणीकरीता पाठविण्यात येत आहे. बनावट ताडीच्या खरेदी-विक्री व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत असून मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

Web Title: Solapur Crime | Manufacture of fake toddy in paper shed, factory seal by raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.