दैव बलवत्तर म्हणून कसेबसे वाचले; पैशांसाठी निवृत्त अधिकाऱ्याला फेकले दरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:21 AM2021-01-29T00:21:38+5:302021-01-29T00:21:59+5:30
दोघांना केली अटक : एकाचा शोध सुरू
कल्याण : पैशांच्या लालसेपोटी प्रकाश भोईर या सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने माळशेज घाटातील दरीत फेकून देण्यात आले होते; परंतु ‘दैव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार मारहाण करून घाटात फेकल्याने गंभीर जखमी झालेले भोईर हे काही तासांनी कसेबसे दरीतून वर आले आणि त्यांनी थेट टोकावडे पोलीस ठाणे गाठले. सोमवारी घडलेल्या या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत तिघा आरोपींपैकी शैलेंद्र दत्तात्रय गायकवाड (वय ३५) आणि भरत मच्छिंद्र गायकवाड (वय ३४) या दोघांना अटक केली.
खडकपाडा परिसरात भोईर राहतात. भोईर यांच्या बँकेचे कामकाज त्यांच्या विश्वासातील शैलेंद्र गायकवाड पाहत होता. भोईर यांच्याकडे किती दागिने, किती पैसे आहेत याची माहिती त्याच्याकडे होती. भोईर यांच्या बँकेतील पासवर्ड, मेल आयडी याचीही माहिती त्याला होती. भोईर यांच्या पश्चात ही संपत्ती आपल्याला मिळेल, अशी लालसा शैलेंद्रला निर्माण झाली होती. त्यात भोईर यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम न दिल्याने शैलेंद्रच्या मनात राग होता. नातेवाईक असलेल्या भरत गायकवाड याला हाताशी धरून भोईर यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्याचा कट शैलेंद्रने आखला. सोमवारी दुपारी त्यांना बहाण्याने रिक्षातून माळशेज घाटात नेण्यात आले. त्याठिकाणी शैलेंद्रने भरत आणि रिक्षाचालक प्रदीप जाधव यांच्या मदतीने भोईर यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्यांना दरीत फेकून दिले. भोईर हे मृत झाले असल्याचे समजून तिघांनी थेट भोईर यांचे घर गाठले. बनावट चावीने घराचे कुलूप उघडून रोकड, दागिने, मोबाइल, मोटारसायकल असा एकूण १४ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. एटीएमने भोईर यांच्या खात्यातून ४० हजारांची रोकडही काढली. दरम्यान दरीत फेकलेले भोईर जखमी अवस्थेत रात्री १० वाजता कसेबसे बाहेर आले. त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने टोकावडे पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
मुद्देमाल केला हस्तगत
पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या पथकाने दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दागिने, ७५ हजारांची रोकड, बॅकेतून काढलेले ४० हजार रुपये, मोटारसायकल हस्तगत केली. फरार आरोपी रिक्षाचालक प्रदीप जाधवचा पोलीस शोध घेत आहेत.