अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:24 PM2022-12-04T15:24:12+5:302022-12-04T15:25:59+5:30

दुचाकीला धडक देऊन चालक वाहनासह पसार झाला.

Son and Father on two-wheeler killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू

googlenewsNext

देवेंद्र धोटे -

बेनोडा शहीद (अमरावती) : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना खडका फाट्यानजीक रेल्वे पुलाजवळ शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. दुचाकीला धडक देऊन चालक वाहनासह पसार झाला.

पोलीस सूत्रांनुसार, माणिकपूर येथील रहिवासी सुरेशसिंह चिचका मरसकोल्हे (६२) व त्यांचा मुलगा रामेश्वर सुरेशसिंह मरसकोल्हे (४०) हे दोघे शनिवारी सकाळी मोर्शी तालुक्यातील गणेशपूर येथे काही कामानिमित्त दुचाकीने गेले होते. सायंकाळच्या सुमारास माणिकपूर गावाकडे परत येत असता खडका फाट्यानजीक रेल्वे पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुरेशसिंह व रामेश्वर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

अपघातास कारणीभूत वाहन पसार झाल्यानंतर मागाहून येणारी एक कार दुचाकीचालक रामेश्वरच्या अंगावरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच बेनोडा (शहीद) पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोघांनाही वरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नजीकच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

रविवारी दुपारच्या सुमारास बापलेकांवर माणिकपूर गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शेकडो लोकांची उपस्थिती होती. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस करीत आहेत.

अलीकडच्या काळात मध्य प्रदेशातील भाजीपाला घेऊन अमरावतीला जाणारे पिकअप सुसाट धावत असतात. अशाच वाहनाने दुचाकीला धडक दिली असल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. सायंकाळी व रात्रीदेखील चालणाऱ्या या सुसाट आणि बेधडक वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांना नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Son and Father on two-wheeler killed in collision with unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.