तरुणानं मंदिरात तरुणीला दिलं लव्ह लेटर; संतापलेल्या नातेवाईकांनी पुजाऱ्याला चोपलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 08:55 AM2022-04-11T08:55:44+5:302022-04-11T08:57:49+5:30
लव्ह लेटर लिहिणारा तरुण न सापडल्यानं तरुणीच्या कुटुंबीयांकडून पुजाऱ्याला बेदम मारहाण
बदायू: उत्तर प्रदेशातल्या बदायूमध्ये एका पुजाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अलापूरमधील उपरैलामध्ये जाहरवीर देव मंदिर आहे. मंदिरातील पुजाऱ्याच्या मुलानं इथे एका तरुणीला प्रेमपत्र दिलं. तरुणी मंदिरात पूजा करण्यासाठी आली होती. तरुणानं प्रेमपत्र दिल्याचं तरुणीनं तिच्या नातेवाईकांना सांगितलं.
संतापलेल्या कुटुंबीयांनी मंदिर परिसरात येऊन पुजाऱ्याच्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पुजाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यांनी मंदिरातही तोडफोड केली. देवी-देवतांच्या फोटोंचं नुकसान केलं. पुजारी रामनिवास पूजा करत असताना काही लोकांनी त्याला घेरलं आणि लोखंडी सळईनं मारहाण केली. त्यांनी मंदिरातल्या मूर्तीही तोडल्या, असं पीडिताचा भाऊ रमेशनं सांगितलं.
माझी मुलगी बऱ्याचदा मंदिरात जाते. तिथे पुजाऱ्याच्या मुलानं अनेकदा तिची छेड काढल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला. मुलगी शाळेत जातानाही पुजाऱ्याचा मुलगा तिचा पाठलाग करतो. मात्र यावेळी त्यानं थेट तिला प्रेमपत्रच दिलं. त्यामुळे आमच्या संयमाचा बांध फुटला, असं आईनं सांगितलं. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.