वडिलांना लुटणाऱ्या आरोपींना मुलाने दाखविली कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 08:58 PM2020-01-21T20:58:52+5:302020-01-21T20:59:46+5:30
वडिलांना लुटल्याची माहिती कळताच त्यांचा १५ वर्षीय मुलगा पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे काही तासातच लुटारू ऑटोचालकाची टोळी पोलिसांच्या कोठडीत पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हैदराबादला जायला निघालेल्या एका जवानाला ऑटोचालकाने रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेले. तेथे साथीदारांच्या मदतीने मारहाण करून त्यांना लुटले. वडिलांना लुटल्याची माहिती कळताच त्यांचा १५ वर्षीय मुलगा पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे काही तासातच लुटारू ऑटोचालकाची टोळी पोलिसांच्या कोठडीत पोहचली. एखाद्या सिनेमातील वाटावी, अशी ही रियल स्टोरी धंतोली परिसरात रविवार रात्री ते सोमवारी पहाटेदरम्यान घडली.
एमआयडीसी हिंगणा परिसरातील इसासनीत राहणारे राजकिशोरसिंग शिवनाथसिंग (वय ४१) हैदराबादला एका कंपनीत कार्यरत आहेत. ते येथे परिवाराच्या भेटीसाठी दोन आठवड्यातून एकदा येतात. शनिवारी येथे आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री हैदराबादला परतण्याची तयारी केली. हिंगणा मार्गावरील सीआरपीएफ बस थांब्याजवळून रविवारी रात्री १०.३० ला ते ऑटोत (एमएच ३१/ ईपी १८४६) बसले. सीताबर्डीत येऊन येथून हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता. ऑटोचालक आरोपी नीलेश ऊर्फ टकल्या निस्ताने याला सिंग यांच्याकडे मोठी रोकड असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने त्याचे साथीदार राहुल गौतम राऊत (वय २१), जिगर संजय काटेवार (वय २३) आणि एका अल्पवयीन साथीदाराला काही अंतरावर आपल्या ऑटोत बसवून घेतले. धावत्या ऑटोत आरोपींनी सिंग यांना भरपूर दारू पाजली आणि त्यांना धंतोलीतून चुना भट्टी, जुनी अजनी परिसरातील रेल्वेट्रॅकवर नेले. तेथे त्यांनी सिंग यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजबूत शरीरयष्टीच्या सिंग यांनी तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे त्यांच्यावर आरोपींनी दगडफेक करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाचशे रुपये आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. रक्ताने माखलेले सिंग कसेबसे धंतोली ठाण्यात पोहचले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय धंतोली ठाण्यात पोहचले. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून आरोपींबाबत विचारपूस सुरू केली.
सहज झाले पोलिसांचे काम !
सिंग यांच्या मुलाने त्यांना ऑटोत बसविल्यानंतर आरोपी टकल्याच्या ऑटोचा क्रमांक टिपून ठेवला होता. त्याने तो पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांचे काम सुलभ झाले. त्या क्रमांकाच्या ऑटोचालकाचा शोध घेत पोलिसांनी सोमवारी पहाटे टकल्याला पकडले. त्यानंतर दिवसभरात राऊत आणि काटेवारसह अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २३ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. अवघ्या काही तासात गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनीता शाहू, सहायक आयुक्त रेखा भवरे आणि ठाणेदार विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डी. पी. नरोटे, उपनिरीक्षक वानखेडे, हवलदार दिनेश काकडे, राजेश भोंगाडे, प्रभाकर तभाने, आसिफ शेख, नायक वीरेंद्र गुळरांधे, राजेंद्र खंडाते, विनोद वडस्कर, दिनेश घुगे, पंकज हेडावू आणि पोलीस शिपायी प्रमोद सोनवणे यांनी बजावली.