तडीपार गुंड जावयानेच केली सासू-पत्नीची निर्घृण हत्या; तीन साथीदारही अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:57 AM2023-07-21T10:57:30+5:302023-07-21T10:58:26+5:30
वर्षभरापूर्वी झालेल्या पत्नीच्या खुनाचा छडा लावण्यातही यश : उरण पोलिसांची दमदार कामगिरी
मधुकर ठाकूर
उरण - उरण तालुक्यातील अज्ञात महिलेच्या हत्येप्रकरणी एका सराईत तडीपार गुंडाला अटक केल्यानंतर आरोपीने सासुबाईच्या खुनाची कबुली देतानाच दुसऱ्या पत्नीचीही गळा आवळून निर्घृणपणे हत्या करून साथीदारांच्या मदतीने मृतदेह धरमतरच्या खाडीत टाकून दिला असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी शिताफीने तपास करीत जावई आणि त्यांच्या अन्य तीन साथीदारांना अटक केली आहे.वर्षापुर्वी हत्या केलेल्या मुलीची भेट घडवून द्यावी याचा सातत्याने तगादा लावल्यानेच जावयाने चिडून सासुबाईचाही काटा काढला असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.
उरण तालुक्यातील पिरकोन- सारडे गाव परिसरातील रस्त्यालगतच्या शिवारात १० जुलै रोजी सकाळीच गळा चिरलेल्या अवस्थेत एका अज्ञात महिलेच्या मृतदेह टाकून दिलेल्या स्थितीत आढळून आला होता. पोलिस पाटील घनश्याम पाटील यांनी खबर देताच उरण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.अज्ञात महिलेच्या हत्येप्रकरणी तपासकामी तातडीने तीन पथके तयार करून ठिकठिकाणी रवाना करण्यात आली होती.मृत महिलेच्या जवळ सापडलेल्या पोलिसांनी गोळा केलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज
आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत मृत महिलेचे नाव भारती आंबेकर ( ५५)असुन ती डोंबिवली येथील असल्याची माहिती मिळाली.मृत महिलेबाबत शेजाऱ्यांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असताजावई मयुरेश अजित गंभीर रा.पोयनाड- अलिबाग याचा मुलीला भेटण्यासाठी तातडीने फोन करुन बोलावून घेतले आहे.जावयाने बोलाविल्याने भारती पोयनाडला गेली असल्याची माहिती शेजारच्या कडून पोलिसांना मिळाली.
पोलिसांना आरोपी मयुरेशचा मोबाईल नंबरही मिळाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचे लोकेशन मिळाले.त्यावेळी आरोपी ठाण्यातील मानपाडा पोलिस हद्दीतील पालावा कोणी-डोंबिवली येथील एका घरात लपून साथीदारांसह लपून बसला असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी वेळ न दवडता मानपाडा पोलिसांच्या मदतीने तत्परतेने हालचाल करत हत्येनंतर राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपी मयुरेश गंभीर व त्याचा एक साथीदार दिलीप अशोक गुंजलेकर झडप घातली. शिताफीने छापा टाकल्याने हत्येचे आरोपी राज्याबाहेर पळून जाण्याच्या आधीच पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी अवघ्या १६ तासांच्या आतच आरोपींच्या शिताफीने मुसक्या आवळल्या.
पोलिसांच्या तपासात आरोपी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला सराईत तडीपार गुंड असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी मयुरेश याने हत्येची हकिगत कथन केली.आरोपी मयुरेशचे भारती आंबुकर मुलगी प्रीती हिच्याशी लग्न केले होते.आरोपीची प्रीती ही दुसरी पत्नी होय. लग्नानंतर दुसरी पत्नी प्रीती हिच्याशी न पटल्याने ऑगस्ट २०२२ मध्येच वर्षा सहलीच्या निमित्ताने अलिबाग येथील साजव्हिला या हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिचा गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर तिचा गुंड साथीदारांच्या मदतीने धरमतरच्या खाडीत मृतदेह टाकून पुरावा नष्ट केला. मात्र मुलीच्या हत्येची बाब आईला आरोपीने कळू दिली नाही.आई केव्हाही मुलीला भेटण्यासाठी विचारणा करायची.जावई तकलादू कारणे देत वेळ मारुन नेत होता.अधुनमधुन सासुबाईना पैसे देऊन गप्प करायचा.जावई मुलीची भेट घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे एव्हाना सासुबाईच्या ध्यानी आले होते.
त्यामुळे सासुबाईनी मुलीची भेट घडवून आणण्यासाठी जावयांकडे तगादाच लावला होता. सासुबाईंच्या सततच्या तगाद्याने जावई कंटाळून गेला होता. त्यामुळे जावयाने सासुबाईचाच काटा काढायचा डाव आखला.
त्याने सासुबाईना मुलीच्या भेटीसाठी फोन करून शिळफाटा येथे बोलावून घेतले.शिळफाटा येथुन साथीदारांसह इनोव्हा गाडीत बसवून खारपाडामार्गे चिरनेर मार्गावरील साई गावाजवळील खिंडीत आणले.खिंडीत आल्यानंतर आपल्याकडील पिस्टलने सासुबाईंच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून गंभीरपणे जखमी केले.त्यानंतर सुऱ्याने गळा चिरून हत्या केली. मृत झाल्याची खात्री करून मृतदेह सारडे गावातील हद्दीतील रस्त्याच्या कडेला टाकून गाडीतून पोबारा केला. नवी मुंबई आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त संजय मोहिते,उपायुक्त पंकज डहाणे , न्हावा-शेवा बंदर पोलिस विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, चंद्रहार पाटील, अनिरुद्ध गाजे, पोलिस हवालदार बलदेव अधिकारी, शशिकांत घरत, घनश्याम पाटील, नितीन गायकवाड,कुणाल म्हात्रे, रुपेश पाटील, सचिन बोठे, धनाजी गावंड, प्रवीण पाटील, दिगंबर नागे, मच्छिंद्र कोळी, सचिन माळशिकारे, प्रमोद कोकाटे, रोहित गावडे आदींनी शिताफीने तपास करीत १६ तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.