जावयाने कोयत्याने केली सासूसह मेव्हणीची हत्या, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:41 PM2022-05-13T18:41:29+5:302022-05-13T18:42:04+5:30
Double Murder Case : निर्मलाबाई भिकाजी पवार (वय ६५) रा शेलुबाजार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे (वय ४०) रा जिंतूर जि परभणी, अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.
मंगरुळपीर : संपत्तीच्या वादातून जावयाने सासू व मेव्हणीची कोयत्याने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना शुक्रवार १३ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे घडली आहे. निर्मलाबाई भिकाजी पवार (वय ६५) रा शेलुबाजार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे (वय ४०) रा जिंतूर जि परभणी, अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार १३ मे रोजी सकाळी आरोपी सचिन धर्मराज थोरात (वय ४२) ,रा जनता वसाहत पुणे याचा सकाळच्या सुमारास सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे यांच्याशी संपत्तीवरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने आरोपी सचिन धर्मराज थोरात याने सासू निर्मलाबाई भिकाजी पवार व मेव्हणी विजया बबनराव गुंजावळे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात एपीआय मंजुषा मोरे, एएसआय अनिरुद्ध भगत, हेकॉ ज्ञानेश्वर राठोड,पोकॉ संदिप खडसे,गोपाल कव्हर, अंकूश मस्के यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस अटक केली, तसेच आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंजुषा मोरे करीत आहेत.
चालक, डॉक्टरानेच त्यांना टाकले रुग्णवाहिकेत
शेलूबाजार येथे सकाळच्या सुमारास जावयाने सासू आणि मेव्हणीवर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी परिसरात शुकशुकाट आणि स्मशान शांतता पसरली होती. त्यामुळे रुग्णवाहिका चालक राहुल खिल्लारे आणि डॉक्टर मिलिंद चव्हाण यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निर्मला पवार व मेव्हणी विजया गुंजावळे यांना उचलून रुग्णवाहिकेत टाकत वाशिम येथे आणले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले .