जागेच्या वादातून मुलाचा खून, वडील गंभीर; पुतण्यानेच केला हल्ला, यवतमाळमधील थरार

By सुरेंद्र राऊत | Published: January 3, 2023 06:51 PM2023-01-03T18:51:21+5:302023-01-03T18:51:27+5:30

यवतमाळातील पांढरकवडा मार्गावर थरार

Son killed over land dispute, father serious; The attack was done by the nephew, the thrill in Yavatmal | जागेच्या वादातून मुलाचा खून, वडील गंभीर; पुतण्यानेच केला हल्ला, यवतमाळमधील थरार

जागेच्या वादातून मुलाचा खून, वडील गंभीर; पुतण्यानेच केला हल्ला, यवतमाळमधील थरार

googlenewsNext

यवतमाळ : जागेचा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या पुतण्याने लोखंडी रॉड हातात घेऊन काकाला बेदम मारहाण केली. वडिलांना सोडविण्यासाठी मुलगा मधात आला असता त्याच्यावरही रॉडने डोक्यावर प्रहार केले. दोघेही बाप- लेक जागेवर निपचित पडल्यानंतर आरोपी पुतण्या तेथून पसार झाला. ही थरारक घटना यवतमाळातील पांढरकवडा मार्गावर दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.    

राहुल नरेंद्र पाली (२४, रा. शारदा चौक) असे मृताचे नाव आहे. तर नरेंद्र जगन्नाथ पाली (५५) हे गंभीर जखमी आहेत. नरेंद्र पाली यांचे टायर रिमोल्डींगचे दुकान आहे. त्याला लागून घर होते. या घराच्या जागेवरूनच वाद सुरू होता. नरेंद्र पाली यांच्या शेजारी त्यांचा मोठा भाऊ जगदीश पाली यांच्या परिवाराचे वास्तव्य आहे. नरेंद्र पाली यांनी जुने घर तोडून दुकानाला लागून बांधकाम सुरू केले. मंगळवारी या ठिकाणी बांधकामावर मजूर होते. तसेच तेथे बोअरवेल खोदण्याचे काम केले जात होते.

अचानक पुतण्या सुरज जगदीश पाली हा तेथे आला. त्याने जागेवरून वाद घालत हातातील लोखंडी रॉडने नरेंद्र पाली यांच्यावर प्रहार केला. त्यांना वाचविण्यासाठी राहुल पुढे आला असता राहुलच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. यात राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. नंतर आरोपीने नरेंद्र पाली यांच्या चेहऱ्यावर रॉडने वार केले. यात नरेंद्र पाली यांचा चेहरा पूर्णत: छिन्नविछीन्न झाला.  हा मारहाणीचा प्रकार सुरू असताना कामावरील मजूर, बोअरवेल खोदणारे तेथून पळून गेले. बघ्यांची मोठी गर्दी जमली. मात्र, कुणीही मदतीला धावून आले नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेतील जमादार अजय डोळे, शहर ठाण्यातील सुरज साबळे, गजानन क्षीरसागर व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

तातडीने जखमींना उचलून वाहनात टाकण्यात आले. रस्त्यावरील वाहन थांबवून जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी राहुल पाली याला मृत घोषित केले. तर नरेंद्र पाली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान, या गंभीर घटनेची माहिती आकाश पाली याने नरेंद्र पाली यांची पत्नी रजनी यांना दिली. त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरज पाली व त्याची आई माधुरी जगदीश पाली (५०) यांनी जागेच्या मोजमापावरून वाद घालून हल्ला केल्याची तक्रार रजनी पाली यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यांना मदतीचा हात नाही-

यवतमाळ शहरात कुठेही गंभीर घटना झाली तर जखमीला मदत केली जात नाही, असे प्रकार वारंवार घडत आहे. पांढरकवडा मार्गावर स्मशानभूमीसमोर आपसी वादात झालेल्या मारहाणीत मुलगा व वडील गंभीर जखमी होऊन कोसळले होते. त्या ठिकाणी बघणाऱ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, एकानेही त्यांना रुग्णालयात हलविण्याची तसदी घेतली नाही. यापूर्वीसुद्धा माळीपुरा चौकात काही युवकांनी आरटीओ एजंटला चाकूने भोसकले होते. तो एजंट रक्ताच्या थारोळ्यात मदतीची याचना करीत होता. त्याला कुणीही मदत केली नाही. उलट त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. असा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारीसुद्धा घडला.

नव्या वर्षात सलग तीन खून 

नव्या वर्षाची सुरुवातच खुनांच्या घटनांनी झाली. वाघापूर येथील पंचशीलनगरमध्ये दारूड्या पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर बाभूळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र बापाने आठ वर्षांच्या चिमुकल्याला ठार केले. या दोन घटनेनंतर मंगळवारी जागेच्या वादातून मुलाचा खून झाला तर वडील गंभीर आहेत. नव्या वर्षात खुनाचे सत्र पहिल्या दिवसापासूनच सुरू असल्याचे दिसून येते. 

Web Title: Son killed over land dispute, father serious; The attack was done by the nephew, the thrill in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.