व्यसनाला कंटाळून मुलानेच केली वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 06:02 PM2018-08-19T18:02:36+5:302018-08-19T18:04:13+5:30
विचित्र वागण्याला आणि व्यसनाला कंटाळून पोटच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने वडिलांचा गळा आवळून खून करून मृतदेह कॅनॉलामध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
पुणे : विचित्र वागण्याला आणि व्यसनाला कंटाळून पोटच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने वडिलांचा गळा आवळून खून करून मृतदेह कॅनॉलामध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी मुलाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांनी दिला आहे.
गणपत बापु शेडगे उर्फ सोन्या (वय १९, रा. तुकाईनगर, वडगांव बुद्रुक, वडगाव) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बापु अशोक शेडगे (वय ४०, रा. तुकाईनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई नामदेव सर्जेराव बंडगर (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. १२ आॅगस्ट रोजी हडपसर येथील कवडे मळा परिसरात ही घटना घडली.
बंडगर हे १२ आॅगस्ट रोजी मगरपट्टा बिट मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून आलेल्या संदेशामध्ये ससाणेनगर येथील कॅनॉलमध्ये एक शव वाहत जात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर घटनास्थळी जावून कॅनॉलमधून शव बाहेर काढण्यात आले. कोणीतरी अज्ञात कारणावरून त्यांचे हातपाय बांधून त्यांना कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे त्यावेळी दाखल फियार्दीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान गणपत याने श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात हजर राहून आपणच वडिलांचा दोरीने व उशीने गळा आवळून आणि लाटण्याने मारहाण केली. मारहाणीनंतर बापु निपचीत पडले असता त्यांचे हातपाय बांधून घराजवळच्या कॅनॉलमध्ये फेकून दिले, अशी कबूली दिली. या प्रकरणी गणपत याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली दोरी, लाकडी दांडके जप्त करण्यासाठी, त्याचे इतर कोणी साथीदार होते का? याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली.