निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा ड्रग्सच्या विळख्यात; एनसीबीने घरावर मारला छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:20 PM2021-06-22T20:20:31+5:302021-07-02T15:54:15+5:30
Drugs Case :दोन वेगवेगळ्या एनसीबीने केलेल्या कारवाईत ९ किलोग्रॅम चरस, ४३६ एलसीडी ब्लॉट्स आणि ३०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्ज प्रकरणात सेवानिवृत्त एसीपीच्या मुलाला अटक केली आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं नाव श्रेयस केंजळे आहे. गोरेगावमध्ये नागरी निवारा येथे त्याच्या राहत्या घरी एनसीबीने छापा टाकून ही कारवाई केली.
दोन वेगवेगळ्या एनसीबीने केलेल्या कारवाईत ९ किलोग्रॅम चरस, ४३६ एलसीडी ब्लॉट्स आणि ३०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. एनसीबीला मिळालेल्या माहितीवरून गोरेगाव पूर्वेकडील नागरी निवारा येथील आरोपी श्रेयस केंजळे याच्या घरी छापा टाकून एनसीबीने मोठा ड्रग्स साथ जप्त केला. घरातून ४९६ एलसीडी ब्लॉट्स आणि ३०० ग्रॅम गांजा २१ जूनच्या रात्री टाकलेल्या छाप्यादरम्यान हस्तगत करण्यात आला.
तर दुसऱ्या एनसीबीच्या ऑपरेशनमध्ये दादरमध्ये २ बाईक जप्त करण्यात आल्या, या बाईकच्या पेट्रोलच्या टाकीत ९ किलो चरस आढळुन आले. ऐकून १७.३ किलो चरस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या बाईक राजविंदर सिंग आणि गुरमित सिंग हे आरोपी ड्रग्ज तस्करीसाठी वापरत होते.
प्रसिद्ध अभिनेते दलिप ताहील यांच्या मुलाला गेल्या महिन्यात ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ध्रुव ताहील याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ध्रुव ड्रग पेडलरकडे व्हॉट्सअॅपवरुन वारंवार अंमली पदार्थांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.