वाटणीवरून सावत्र आईचा काटा काढणाऱ्या मुलाला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:51 PM2021-05-08T21:51:53+5:302021-05-08T21:53:15+5:30
Murder Case : या गुन्ह्यात आरोपी मुलाला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
पुसद (यवतमाळ) : शेतीच्या हिस्से वाटणीवरून मुलाने सावत्र आईचा खून केला. सावत्र बहिणीलाही गंभीर जखमी केले. या गुन्ह्यात आरोपी मुलाला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
विठ्ठल नामदेव कांबळे रा.शेलू खु. असे शिक्षा झालेल्या मुलाचे नाव आहे. १२ ऑक्टोबर २०१४ रोजी आरोपीने शेतीच्या हिस्से वाटणीवरून सावत्र आई बेबी कांबळे यांच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. आरोपीने शेतातच बेबीबाई व त्यांची मुलगी मनीषा यांना काठीने मारहाण केली. यात बेबीबाई जागीच मृत्यू पावल्या. याप्रकरणी त्यांचा भाऊ दादाराव खंदारे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गावंडे यांनी आरोपी विठ्ठलला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोक्त ॲड.अतुल चिद्दरवार यांनी १२ साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी काळबांडे यांनी सहकार्य केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रभाकर कांबळे याला निर्दोष सोडण्यात आले.