सोनाली फोगाट खून प्रकरण: कर्लीस’मधील बाटलीत आढळले ड्रग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:33 AM2022-09-02T06:33:37+5:302022-09-02T06:34:00+5:30
Sonali Phogat murder case: हणजूण पोलिसांनी गुरुवारी कर्लीस बारची झडती घेतली असता बारमधील एका बाटलीमध्ये ड्रग्ज आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली.
पणजी : सोनाली फोगाट खून प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे हणजूण पोलिसांनी गुरुवारी कर्लीस बारची झडती घेतली असता बारमधील एका बाटलीमध्ये ड्रग्ज आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली. यामुळे बार भोवतील कारवाईचा फास आणखी आवळला जाणार आहे.
साेनाली फाेगाट यांचा मृत्यू २२ ऑगस्ट राेजी गाेवा येथे एका रिसाॅर्टमध्ये झाल्यानंतर एकच खळबळ उडाली हाेती. सध्या गोवा पोलिसांचे एक पथक हिस्सार-हरयाणा येथे असून स्थानिक पोलिसांशी चर्चा करून नंतर सोनाली यांच्या फार्म हाऊसवर पथकाने तपासणी केली. या ठिकाणी काही महत्त्वाचे पुरावे हाती आल्याचेही, सक्सेना यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत पीए सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग, कर्लीस बारचा मालक एडविन नुनीस, रूमबॉय दत्ताराम पेडणेकरसह आणखी एकाला अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी फोगटच्या फार्महाऊसमधून सीसीटीव्हीचा डीव्हीआर, लॅपटॉप आणि इतर कागदपत्रांसह एका व्यक्तीला ताब्यात घेतले. फोगट यांच्या कुटुंबीयांनी फार्म हाऊसमधून लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर आणि काही कागदपत्रे चोरीला गेल्याची तक्रार केली होती.