Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:50 AM2022-08-28T11:50:21+5:302022-08-28T11:51:07+5:30
सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे.
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात तिचा पीए आणि ड्रग सेवन हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. हार्ट अॅटॅक आता हत्येत बदलू लागला आहे. सोनालीच्या भावाने पीए सुधीर सांगवानवर बलात्कार, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप लावले होते. तेव्हापासून सोनालीचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय बळावू लागला होता.
सोनाली प्रकरणी तिचा पीए, मित्र, कर्ली क्लबचा मालक, सोनाली राहत होती त्या हॉटेलचा कर्मचारी व त्याला ड्रग पुरविणारा ड्रग पेडलर अशा पाच जणांना अटक झाली आहे. सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे.
या साऱ्या प्रकरणावर अखेर हरियाणाचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांच्यात आज फोनवर चर्चा झाली आहे. याची माहिती गोव्याचे सीएम प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सावंतांकडे केली आहे. खट्टर यांना सोनालीचे कुटुंबीय भेटले होते, त्यांनीच ही मागणी केल्याचे खट्टर म्हणाले. यावर मला काही समस्या नाहीय. मी गरज पडली तर आजच सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवेन, असे सावंत म्हणाले.
पोलिसांनी कर्ली क्लबच्या बाथरुममधून काल दीड ग्रॅम ड्रग जप्त केले होते. ते मेथॅम्फेटामाइन असल्याचे समोर आले आहे. सोनालीचा पीए सुधीर सांगवानने ते ड्रग पेडलरकडून घेतले आहे. गोवा पोलिसांनी काल रात्री आणखी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. क्लब मालक एडविन न्यून्स यालाही अटक करण्यात आली आहे. पहिला ड्रग पेडलर हा सोनाली ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्या हॉटेलचाच कर्मचारी आहे. सांगवान आणि त्याने ड्रगची देवानघेवाण केल्याचे कबूल केले आहे. सोनालीली मेथॅम्फेटामाइन पाण्यातून देण्यात आले होते.