सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीस गेलेल्या ६१ जणांना बागेश्वरधाम नव्हे तर पोलीसच पावले
By धीरज परब | Published: May 14, 2023 09:34 AM2023-05-14T09:34:34+5:302023-05-14T09:34:59+5:30
मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौका जवळील मैदानात भाजपाने १८ व १९ मार्च रोजी धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरधाम सरकार यांच्या दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता
मीरारोड - मीरारोड येथील धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरधाम सरकार यांच्या कार्यक्रमास आलेल्या ६१ भाविकांना बागेश्वरधाम पावले नसले तरी पोलीस मात्र पावले आहेत . कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र , सोनसाखळी मारणाऱ्या राजस्थान मधील बावरिया टोळीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी ५० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला आहे.
मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौका जवळील मैदानात भाजपाने १८ व १९ मार्च रोजी धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरधाम सरकार यांच्या दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . सुमारे १ ते दिड लाख लोक आल्याने प्रचंड गर्दी उसळलेल्या त्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आयोजकांचा बंदोबस्त असताना देखील महिला चोरटयांनी धुमाकूळ घातला . त्यांनी तब्बल ६० महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र , सोनसाखळी तर १ पुरुषाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली होती.
त्यावेळी ६ महिलांना पकडण्यात आले होते . त्यात गितादेवी सरदार सिंह (४५) , हेमा उर्फ हिरोदेवी सुरज (३०) व सेटू करमबीर सिंग हेमा उर्फ हिरोदेवी सुरज (२०) तिघी रा. सिरावास ; पिंकी सुर्यप्रताप सिंग ऊर्फ राहुल (२५) रा . खेरथल ; सोनिया अनिल कुम्हार (२२) रा . भोरा कॉलनी ह्या राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील तर रेश्मा हिराराम बावरीया उर्फ संत्रा बिरेंदर (५५) बावरीया बस्ती, जि. झुनझुनु ह्या आरोपींचा समावेश होता . मीरारोड पोलीस ठाण्यात त्या बाबत ४ गुन्हे दाखल झाले होते . सुमारे १ किलो इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने चोरटयांनी मारल्याने खळबळ उडाली होती.
या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी घेत चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासह अन्य आरोपीना अटक करण्यासाठी गुन्हे शाखा , मीरारोड व काशीमीरा पोलिसांची ४ पथके नेमली होती . कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नागरिकांनी दिलेली माहिती, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण , घटनास्थळावरील व अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले . आरोपींनी येण्या - जाण्यासाठी वाहनांचा वापर केल्याने ते राजस्थान मधील भरतपुर व अलवर जिल्हयातील असल्याचे निष्पन्न झाले होते.
गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे, कैलास टोकले व त्यांच्या पथकाने तसेच मीरारोड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हानिफ शेख, उपनिरीक्षक किरण वंजारी व पथकाने राजस्थानच्या भरतपूर, अलवर भागातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने महिनाभर तळ ठोकून तपास चालवला होता . आरोपी महिला व पुरुष हे गर्दी होणाऱ्या धार्मिक, राजकीय वा सामाजिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन एखाद्या व्यक्ती भोवती गाराडा घालायचे व त्यांचे दागिने चोरायचे . चोरी केलेले दागिने हे त्या टोळीचा म्होरक्या घेऊन राजस्थान येथील गावी पळून जायचा . तर इत्तर साथीदार मात्र कार्यक्रमात पुन्हा जाऊन चोरी करायचे अशी त्यांची कार्यपद्धती आहे.
आरोपी हे सराईत दरोडे, जबरी चोरी सारखे भयानक गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याने त्यांना अटक करुन चोरी केलेले दागिने हस्तगत करणे अतिशय जोखमीचे होते. मात्र पोलिसांनी राजस्थान मधून त्यांचे म्होरके असलेले अर्जुन सिंग बिरेंद्र बावरीया रा. रुंध इकरन व रंजीत कुमार उर्फ प्रविण कुमार जगदीश प्रसाद बावरीया रा. भोगाँव, बिछवा पोलीस ठाणे, मैनपुरी, उत्तरप्रदेश यांना अटक केली . त्यांच्या कडून चोरीला गेलेल्या पैकी ७८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लगडी असा सुमारे ५० लाखांचा ऐवज हस्तगत केला.
जप्त केलेला मुद्देमाल आयुक्त मधून पांडेय यांच्या हस्ते मीरारोड येथील एका सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात संबंधित फिर्यादी यांना परत करण्यात आला . यावेळी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक , गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, मीरा भाईंदर परिमंडळ १ चे उपायुक्त जयंत बजबळे, सहायक आयुक्त विलास सानप आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते . यावेळी फिर्यादी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.