स्वत:ची रिक्षा चोरीला जाताच त्याने पळवल्या इतरांच्या ऑटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:22 AM2021-09-29T06:22:03+5:302021-09-29T06:22:39+5:30
‘रिक्षा चोरी’चे धुळे कनेक्शन : सांताक्रूझ पोलिसांची कारवाई
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : मुंबईत रिक्षा चोरी करत नंतर त्याची धुळ्याला नेऊन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांताक्रूझ पोलिसांना मंगळवारी यश मिळाले. धक्कादायक म्हणजे धुळे जिल्ह्यातील बहुतेक रिक्षांमध्ये एमएच-०१ आणि ०२ या क्रमांक असून यातील सूत्रधाराची स्वतःची रिक्षा चोरीला गेल्यावर त्याने ही योजना आखल्याचे उघड झाले आहे.
जब्बार खान, आबिद फैजल शेख, वसीम शेख आणि जावेद खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते सर्वजण सांताक्रूझ आणि वांद्रे येथील रहिवासी आहेत. व्यावसायाने रिक्षाचालक असलेले आरोपी धुळ्यातील अस्लम रमजान मणियाराला चोरीच्या ऑटो विकत होते. मुख्य सूत्रधार आबिद हा जुहूचा रहिवासी असून त्याची आणि त्याच्या वडिलांची रिक्षा चोरीला गेल्यानंतर त्याने ऑटो रिक्षा चोरीचा व्यवसाय सुरू केला.
सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी योगेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी आम्ही सांताक्रूझमध्ये रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत आम्ही वाहतूक विभागाकडे या रिक्षाची माहिती तपासली तेव्हा या रिक्षेला धुळे येथे कालबाह्य झालेल्या विम्यासाठी दंड करण्यात आल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार आम्ही धुळे येथे धाव घेत चोरीला गेलेली रिक्षा ताब्यात घेतली. तपासात ही रिक्षा अवघ्या ४० हजार रुपयांना विकण्यात आल्याचे उघड झाले.
अवघ्या २७ हजारांत मिळतेय रिक्षा !
- पोलिसांनी तपासात प्रथम पाच रिक्षा जप्त केल्या. परंतु अधिक तपासात धुळ्यात चोरीच्या रिक्षा विकण्याचे मोठे रॅकेट त्यांना सापडले. सांताक्रूझ भागात रिक्षा पार्क करणारे बहुतेक ऑटो चालक बोरिवली, मीरा रोड, दहिसर आणि कांदिवलीचे रहिवासी आहेत.
- दररोज ते सांताक्रूझ येथे रस्त्यावर रिक्षा पार्क करायचे. तेथून आरोपी रिक्षा चोरी करत होते. त्यानंतर त्या रिक्षा ठाण्याजवळील पडघा टोलनाका येथून मणियार हा गोळा करत नंतर त्या धुळ्यात विकत असल्याचे तपासातून समोर आले आहे.