१६ तासात आराेपी लागले गळाला; मारहाण करुन कारचालकास लुबाडणारे चारजण जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 09:01 PM2021-10-01T21:01:01+5:302021-10-01T21:09:59+5:30
Crime News : लातूर-नांदेड मार्गावरील घटना : वाहनासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : कारला धडक देत चालकाला चार जणांनी मारहाण केली. यावेळी राेख २० हजार, माेबाईल असा मुद्देमाल लुबाडल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील कृषी महाविद्यलाय परिसरात बुधवारी २९ सप्टेंबरराेजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाेलीस पथकाने चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह माेबाईल आणि पाच हजारांचा राेकड असा १ लाख ६५ हजारांचा मुद्देमला जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी विठ्ठल पंढरी चपटे (३१ रा. गांजूर ता. चाकूर) हे २९ सप्टेंबर राेजी हे पुण्याला कारने (एम़एच़ १२ क्यू़ जी़ ७८२२) निघाले हाेते. दरम्यान, लातूर येथून भातांगळीकडे जीपमधून चार जण २९ सप्टेंबरराेजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जात हाेते. कृषी महाविद्यालयाच्या परिसरात खड्ड्यांमुळे वाहन सावकाश जात असताना, जीपचालकाने फिर्यादीच्या कारला धडक देत १ लाख रुपयांचे नुकसान झाले. उलट तू आमच्या वाहनाला धडक देताेस का? तुला माहीत आहे का, आम्ही काेण आहाेत असे म्हणून फिर्यादीस कारबाहेर ओढून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय, जवळ असलेले २० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत, कारमधील अन्य लाेकांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या खिशातील माेबाईल जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी याप्रकरणी विक्की पांडुरंग जाधव (२४), मुजीब मुबारक शेख (२६), प्रविण सुरेश बेंबडे (२३) आणि अमाेल हरिश्चंद्र निराळवाड (२५ सर्व रा. भातांगळी ता. लातूर) यांना अटक करण्यात आली. अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक जिलानी मानुल्ला यांनी दिली. अटकेतील आराेपीकडून जीप (एम़एच़ १४ बी़आऱ ८०६३), माेबाईल आणि राेख पाच हजार असा एकूण १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१६ तासात आराेपी लागले गळाला...
२९ सप्टेंबरराेजी रात्री ९ वाजता लातूर-नांदेड महामार्गावर घडलेल्या घटनेतील आराेपी अज्ञात हाेते़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिसांनी तातडीने तपासाची चक्रे गतिमान केली़ अखेर गुरुवारी दुपारपर्यंत यातील चारही आराेपींच्या मुसक्या आवळत पाेलिसांनी लुबाडलेला मुद्देमाल जप्त केला आहे़ घटनेनंतर अवघ्या १६ तासामध्ये आराेपींना ताब्यात घेत घटनेचा छडा लावण्यात पाेलीस पथकाला यश आले आहे़