फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:14 PM2021-05-22T21:14:53+5:302021-05-22T21:16:35+5:30

Crime News : आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण प्रकरण : पोलीस सहा आरोपींच्या मागावर, डीबी पथके सक्रिय

SP issues two-day ultimatum to nab absconding sand smugglers | फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Next
ठळक मुद्देचंदन हातागडे या कार्यकर्त्याला पांढरकवडा रोडवरील गॅरेजमध्ये नेऊन बेदम मारहाण करण्यात आली होती. एसपींनी तंबी दिल्यामुळे दोन्ही ठाण्यांतील शोध पथके सक्रिय झाली असून, फरार आरोपींच्या अटकेसाठी व्यूहरचना केली जात आहे.

यवतमाळ : येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणातील सहा आरोपी फरार आहेत. राजकीय आश्रय असलेल्या या आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना शनिवारी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.


पोलीस अधीक्षक भुजबळ शनिवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथेच त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी संधी दिली जाऊ नये, दोन दिवसांत ते लॉकअपमध्ये दिसावे असा अल्टिमेटम यवतमाळ शहर व अवधूतवाडीचे ठाणेदार तसेच तेथील शोध पथकांना दिला आहे. या आरोपींच्या शोधाची जबाबदारी यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांच्यावरही सोपविण्यात आली आहे. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे उपस्थित होते.

चंदन हातागडे या कार्यकर्त्याला पांढरकवडा रोडवरील गॅरेजमध्ये नेऊन बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी नऊ रेती तस्करांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले गेले. त्यामध्ये सत्ताधारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. यातील तीनजण आतापर्यंत अटक झाले असून, ते २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत. इतर सहा आरोपी मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एसपींनी तंबी दिल्यामुळे दोन्ही ठाण्यांतील शोध पथके सक्रिय झाली असून, फरार आरोपींच्या अटकेसाठी व्यूहरचना केली जात आहे.


राजकीय अभय मिळविण्याचा प्रयत्न

१६ कोटी रुपये भरून १२ रेती घाट घेतले गेले. परंतु, त्याआड मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीचा उपसा केला जात आहे. यातील बहुतांश घाटांमध्ये राजकीय भागीदारी असल्याने या रेतीमाफियांना राजकीय अभयही आहे. हे अभय असल्यानेच प्रशासनाचेही आपल्याला संरक्षण मिळेल, असा विचार करून आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्याचे नग्न व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आले. मानवाधिकाराला आव्हान देणाऱ्या या घटनेतील आरोपींच्या अटकेसाठी एसपींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतरही प्रशासनाला गृहित धरणाऱ्या रेती माफियांकडून अटक टाळण्यासाठी राजकीय संरक्षण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. या संरक्षणासाठी मुंबईतून फिल्डिंग लावण्याचा शब्दही एका राजकीय पदाधिकाऱ्याने या तस्करांना देऊन जणू ‘नॉनकरप्ट’ पोलीस प्रशासनालाच आव्हान दिले आहे. दरम्यान, रेती घाट घेतलेल्या कंत्राटदारांनीही एसपींना निवेदन देऊन तो माहिती अधिकार कार्यकर्ता व त्याचे भाऊ रेती घाटांवर येऊन खंडणी मागत असल्याचे नमूद केले होते. परंतु, हे निवेदन अपहरण व मारहाणीच्या या घटनेतून बचावासाठी असल्याचा पोलीस वर्तुळातील सूर आहे.

Web Title: SP issues two-day ultimatum to nab absconding sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.