भारतात आलेल्या स्पॅनिश महिलेवर बलात्कार; पीडिता स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:12 PM2024-03-02T12:12:30+5:302024-03-02T12:13:57+5:30
सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला पतीसोबत झारखंडमधील दुमका येथे पोहोचली होती. यावेळी सुमारे ८ ते १० जणांनी तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडितेने स्वत: पतीसोबत दुचाकीवरून उपचारासाठी हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुमहाट येथील आहे. स्पेनमधील एक महिला झारखंडमध्ये आली होती. ही घटना गेल्या शुक्रवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेसोबत तिचा नवराही होता. सर्वजण दुचाकीवरून भागलपूरच्या दिशेने निघाले होते. पती-पत्नी परदेशातून टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. हे लोक स्पेनच्या आधी पाकिस्तानात गेले. त्यानंतर पाकिस्तानातून बांगलादेश आणि नंतर बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले. याठिकाणी हे लोक दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावात तंबूत थांबले होते.
झारखंडमधील पीडित स्पॅनिश महिलेला नेपाळला जायचे होते. पीडित महिला टेंटमध्ये असताना सुमारे आठ ते दहा जण तेथे पोहोचले आणि त्यांनी महिलेसोबत सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला पतीसोबत दुचाकीवरून दुमका रुग्णालयात पोहोचली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पीडितेला सरैयाहाट सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. परदेशी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला. या गदारोळात सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून हे दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचे वर्णन केले आहे. राज्याचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव म्हणाले की, हेमंत सोरेन पार्ट २ सरकारमध्ये महिला पूर्णपणे असुरक्षित आहेत. एसआटी तत्काळ स्थापन करून दोषींना अटक करावी आणि स्पॅनिश महिलेला शक्य ती सर्व मदत करावी. या घटनेचे प्रतिध्वनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पटलावरही ऐकू येणार असल्याचे प्रतुलने सांगितले. या घटनेने राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पर्दाफाश झाला असून ही राज्य सरकारच्या तोंडावर मोठी चपराक असल्याचे प्रतुल म्हणाले. राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी.