‘स्पेशल 26’ कांड! ईडीचे अधिकारी बनून आले अन् कोट्यवधी रुपये लुटून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 01:40 PM2023-10-15T13:40:33+5:302023-10-15T13:41:14+5:30
बँक अधिकाऱ्याच्या घरावर बनावट छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' चित्रपट आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार बनावट सीबीआय अधिकारी बनून व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकल्याचे दाखवण्यात आले होते. अशीच एक घटना राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील बाबा हरिदास नगर भागात घडली आहे. ईडीचे अधिकारी म्हणून चार-पाच जणांनी एका बँकरच्या घरात घुसून हवाला पैसे शोधण्याच्या बहाण्याने 3 कोटी 20 लाख रुपये लुटले आणि घरातून पळ काढला.
माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आणि काही वेळाने एका आरोपीला पकडले. पोलिसांनी या आरोपीकडून 70 लाख रुपये जप्त केले आहेत. आता त्याच्या उर्वरित साथीदारांच्या शोधासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास नगरमध्ये राहणारे बँकर, गुरुग्राम येथील एका खासगी बँकेत अधिकारी आहे. नुकताच त्यांनी गालिबपूर येथील प्लॉट 4.70 कोटींना विकला होता.
यातील सुमारे दीड कोटी रुपये गुंतवले आणि उर्वरित 3.20 कोटी रुपये घरात ठेवले होते. याची खबर आरोपींना मिळाली. यानंतर आरोपींनी टीम तयार केली आणि ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून घरावर छापा मारला. आरोपींना पलंगात लपवलेले 3.20 कोटी रुपये दिसले. आरोपींनी ते पैसे घेऊन पोबारा केला. आरोपी निघून गेल्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नरेलाजवळ तपासणी करताना एका आरोपीला पकडले. उर्वरित रक्कम व आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.