सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 09:35 PM2021-01-27T21:35:01+5:302021-01-27T21:35:12+5:30
तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून ते ऑडिटरही आहेत.
पुणे : ऑडिटर पॅनेलमधून नाव वगळून नये, यासाठी ५० हजारांची लाच मागून ३० हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्थेतील विशेष लेखापरिक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले.
ललितकुमार भालचंद्र भावसार (वय ५५) असे या विशेष लेखापरिक्षक वर्ग २ अधिकाऱ्याचे नाव आहे.तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून ते ऑडिटरही आहेत. सहकारी संस्थांच्या ऑडिटर पॅनेलमधून त्यांचे नाव वगळून नये, यासाठी ललितकुमार भावसार याने त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. या ऑडिटरने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना भावसार याने तडजोड करुन ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविली. त्यानंतर सेंट्रल बिल्डिंग येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना भावसार याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.