जेलमध्ये पूर्ण झाली साहिलची 'ही' खास मागणी; अधिकाऱ्यांनी सांगितलं का पूर्ण केली आरोपीची इच्छा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:20 IST2025-03-27T14:18:59+5:302025-03-27T14:20:05+5:30
जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहेत.

फोटो - आजतक
मेरठ जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. जेलमध्ये जाण्यापूर्वी दोघेही व्यसनी होते. पण आता जेलमध्ये त्यांची प्रकृती सुधारत आहे. दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच दरम्यान, साहिलने जेल अधिकाऱ्यांकडे एक खास मागणी केल्याचं समोर आलं आहे. हे ऐकून अधिकाऱ्यांना सुरुवातीला धक्का बसला पण लवकरच त्यांनी त्याची ती मागणी पूर्ण केली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये सर्वांना शिस्त पाळावी लागते. कोणत्याही कैद्याची जी काही मागणी असेल ती नियमांनुसार पूर्ण केली जाते. मेरठ जेलचे वरिष्ठ जेल अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा म्हणाले की, साहिलने केस कापण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेल प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे आणि त्याचे केस कापले आहेत.
मुस्कानसोबत, साहिलनेही जेल अधिकाऱ्यांना सरकारी वकील उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज दिला आहे. दोघांचेही अर्ज अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी पाठवले आहेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, दोघांचीही प्रकृती आता चांगली आहे. दोघंही जेवत आहेत. दोघांचं वेगवेगळं समुपदेशन केलं जात आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
खळबळजनक! एक आठवडा केली रिहर्सल; मुस्कान-साहिलने 'असा' रचला सौरभच्या हत्येचा कट
मेरठमधील सौरभ हत्याकांडात एकामागून एक मोठे खुलासे होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करण्यापूर्वी आरोपींनी याची एक आठवडा रिहर्सल देखील केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कानने साहिलसोबत मिळून सौरभची हत्या करण्याचा प्लॅन केला होता.त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी मुस्कानने सौरभला घरी बोलावलं, साहिल आधीच तिथे उपस्थित होता.
मुस्कानने सर्वात आधी सौरभच्या मानेवर चाकूने वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर साहिलने सौरभची हत्या केली. हत्येनंतर दोघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला होता. साहिलने सांगितलं की, त्याला मृतदेह जमिनीत पुरायचा होता. हे काम पार पाडण्यासाठी त्याने आधीच सर्व तयारी केली होती. पण नंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिक ड्रममध्ये ठेवले.