अनिल जयसिंघानीला बेड्या! शिर्डीतून गुजरातला पळाला, ओळख लपवून राहिला, पण पोलिसांनी सापळा रचून केली अटक
By मनीषा म्हात्रे | Published: March 20, 2023 02:03 PM2023-03-20T14:03:35+5:302023-03-20T15:20:44+5:30
अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
मुंबई - अमृता फडणवीस लाच प्रकरणात आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिघांनी याला गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ७२ तासांपासून अनिल जयसिंघानी पोलिसांना चकवा देत होता. जयसिंघानीच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके काम करत होती. आरोपी शिर्डीतून गुजरातच्या बरदोली इथं गेल्याची माहिती पोलिसांना हाती लागली. त्यानंतर गुजरातमध्ये सापळा रचून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता. गुजरातला पोलिसांची ३ पथके पाठवण्यात आली. आरोपीने पोलिसांना ७२ तास चकवा दिला. त्यानंतर अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि एका नातेवाईकालाही अटक करण्यात आली. जयसिंघानी याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली.
अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर आतापर्यंत १४-१५ गुन्हे नोंद आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आरोपी जयसिंघानी हा फरार होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. आरोपी इंटरनेटचा शिताफीने वापर करून अनेकांच्या संपर्कात राहत होता. पोलीस आरोपीची आणखी चौकशी करत आहेत.
कोण आहे अनिल जयसिंघानी?
जयसिंघानी हा सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतला होता. तो एकप्रकारे टोळी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची माहितीही पोलिसांना देत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा २०१५ -१६ मध्येही अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. त्यानंतर, तिच्याशी पूर्णत: संपर्क तुटला. अनिक्षा ही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. ती उच्च शिक्षित आहे.
त्यानंतर २०२१ च्या सुमारास पुन्हा अनिक्षा अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. अमृता फडणवीस यांच्याकडे अनिक्षाने वडिलांची सुटका व्हावी यासाठी १ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर फडणवीसांना अडकवण्यासाठी सर्व गोष्टींची व्हिडिओ शूटींग अनिक्षाकडून केले जात होते. याबाबत विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.