तीन आलिशान फ्लॅट्स, लक्झरी गाड्या; १२ तास चालला छापा, निलंबित अधिकारी कुबेर निघाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 09:02 AM2021-09-02T09:02:08+5:302021-09-02T09:03:51+5:30
निलंबित मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याच्या घरावर छापा; अधिकाऱ्यांच्या हाती लागलं घबाड
पाटणा: बिहारमध्ये धनकुबेर सरकारी अधिकाऱ्यांविरोधात सुरू असलेली कारवाई सुरुच आहे. काल हाजीपूर नगर परिषदेचे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी अनुभूती श्रीवास्तव यांच्या पाटण्यातील फ्लॅटवर विशेष दक्षता पथकानं छापा टाकला. बारा तासांहून अधिक वेळ कारवाई सुरू होती. निलंबित अधिकाऱ्याकडे प्रचंड मोठी अवैध संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. धाडीत अधिकाऱ्यांच्या हाती अतिशय महत्त्वाची कागदपत्रं लागली आहेत.
पाटण्यातील रुकनपुरा येथील अपार्टमेंटमध्ये असलेल्या अनुभूती श्रीवास्तव यांच्या फ्लॅटवर काल विशेष दक्षता पथकानं धाड टाकली. श्रीवास्तव यांच्याकडे आणखी दोन फ्लॅट असल्याची माहिती तपासातून समोर आली. यातला एक फ्लॅट पाटण्यातच असून दुसरा इंदूरमध्ये आहे. दोन्ही फ्लॅटशी संबंधित कागदपत्रं धाड टाकणाऱ्या पथकाला मिळाली आहेत. याशिवाय श्रीवास्तव यांनी त्यांची पत्नी आणि मुलाच्या नावावर विमा आणि म्युच्युअल फंड्सदेखील खरेदी केले होते. त्यासाठी ते दरवर्षी १५ लाखांहून अधिकचा प्रीमियम भरायचे. त्यांच्याकडे इनोव्हा, अर्टिगासारख्या महागड्या गाड्यादेखील आहेत. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
छापेमारीदरम्यान विशेष दक्षता पथकाला आक्षेपार्ह कागदपत्रं आढळून आली आहेत. फिक्स डिपॉझिट, एलआयसी, रियल इस्टेटसह अनेक ठिकाणी श्रीवास्तव यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कमदेखील जप्त करण्यात आली आहे. मात्र त्याबद्दलचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. श्रीवास्तव यांच्याकडे असलेल्या बहुतांश संपत्तीचा तपशील सरकारकडे नाही. श्रीवास्तव यांनी अनेकदा परदेश प्रवास केला असून त्यावर मोठा खर्च केल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.