स्पीड ब्रेकर आला अन् त्या तरुणीने घेतली धावत्या रिक्षेतून उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:35 PM2020-02-15T17:35:57+5:302020-02-15T17:38:40+5:30
तरुणीच्या प्रसंगावधानामुळे तिच्यासोबत घडणार अनर्थ टळला आहे.
मुंबई - भावाच्या घरी गेलेली तरुणी आपल्या घरी परतत असताना अनर्थ घडणार होता. मात्र, तरुणीच्या प्रसंगावधानामुळे तिच्यासोबत घडणार अनर्थ टळला आहे. गेल्या वर्षांपासून महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून महिलांनी सतर्क राहण्याचे धडे गिरवले जातात. त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे. प्रसंगावधान दाखवत तरुणीने स्वतःची अब्रू वाचवली आहे.
भावाच्या घराहून तरुणीने स्वतःच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. मात्र, रिक्षाचालक वारंवार तिला त्यांच्यासमोरील आरशातून न्याहळत होता. तिच्या हे लक्षातही आलं होतं. नंतर रिक्षाचालकाने रिक्षा चुकीच्यादिशेने वळवली आणि या घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. हा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात घडला आहे.
गुरुवारी रात्री २० वर्षीय तरुणी मुलुंड कॉलनी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे गेली होती. रात्री घरी परतण्यासाठी तिने रिक्षेने जाण्याचा निर्णय घेतला. या तरुणीने रिक्षावाल्याला मुलुंडच्या पंचरत्न भागात रिक्षा नेण्यास सांगितले. मात्र, या रिक्षाचालकाने रिक्षा भलत्याच दिशेने वळवल्याचा आरोप या मुलीकडून करण्यात आला. रिक्षाचालक आरशातून तिच्याकडे वारंवार पाहत अश्लील चाळे देखील करत होता, असं देखील त्या तरुणीचे म्हणणं आहे. या रिक्षावाल्याने रिक्षा चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान दाखवत तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारत स्वतःची अब्रू वाचवली.
स्पीडब्रेकर आला अन् तिने मारली रिक्षेतून उडी
स्पीडब्रेकरसाठी रिक्षावाल्याने रिक्षाचा स्पीड कमी केला आणि याचा फायदा घेऊन घाबरलेल्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत पटकन धावत्या रिक्षेतून उडी मारली. दरम्यान रिक्षामधून उडी मारल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने तिला मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या तरुणीने मुलुंड पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तरुणीची तक्रार नोंदवून घेत आता अज्ञात रिक्षाचालकांचा शोध सुरु केला आहे.