बोगस प्रतिज्ञापत्रांचा सूत्रधार कोण? तपासाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 08:04 AM2022-10-13T08:04:02+5:302022-10-13T08:04:25+5:30
पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून लाखो प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निर्मल नगर पोलिसांनी जप्त केलेल्या ४,५०० बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकला रवाना झाली आहेत. कागदपत्रे कोणी व कुठून मिळवली या सर्व बाजूने पथक अधिक तपास करत आहे.
पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून लाखो प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येत आहेत. त्यानुसार ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून शिवसैनिकांची ही खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यासाठी तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे सापडली
मुंबई पोलिसांना ४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे सापडल्याने वादात भर पडली आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. याच्या पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकसह विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या तपासातून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.