नागपुरात भरधाव ट्रकने आजोबा-नातवाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:12 PM2020-02-03T22:12:34+5:302020-02-03T22:13:49+5:30
कामठी-भंडारा मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीवर स्वार आजोबा आणि नातवाला चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी-भंडारा मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीवर स्वार आजोबा आणि नातवाला चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीवर स्वाराची मुलगी आणि नातही जखमी झाल्या. यामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जीवनलाल मोतीलाल साहू (५०) आणि श्रेष्ठ पन्ना प्रजापती (६) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमीत लीला पुन्नीलाल प्रजापती (२६) आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी रिद्धीचा समावेश आहे. गुलशननगर येथील रहिवासी जीवनलाल साहू बांधकाम ठेकेदार होते. त्यांच्या परिवारात भरत आणि संजय ही दोन मुले आणि मुलगी लीला आहे. लीला उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये राहते. ती आईवडिलांना भेटण्यासाठी सकाळी ७ वाजता मुलगा आणि मुलीसह नागपुरात आली. लीलाने शारदा चौकात बसमधून उतरल्यानंतर वडिलांना फोन करून घेण्यासाठी बोलावले. साहू मुलीला आणण्यासाठी बाईकने तेथे पोहोचले. लीलाजवळ सामान असल्यामुळे साहू यांनी मुलगा भरत आणि संजयला बाईक घेऊन येण्यास सांगितले. वडिलांच्या बाईकवर लीला, तिचा मुलगा आणि मुलगी घराकडे जात होते. तर भरत आणि संजय सामान घेऊन जात होते. यशोधरानगर ठाण्याच्या कामठी मार्गावरील शारदा कंपनीजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. ट्रकच्या चाकात आल्यामुळे साहू आणि त्यांचा नातू गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. नेहमीच अपघात घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी नागरिकांना शांत करून वाहतूक सुरळीत केली. महिनाभरात कळमना ठाण्याच्या परिसरातील ही दुसरी मोठी घटना आहे. यापुर्वी बाजारातून परत येणाऱ्या दोन युवकांना चिखली उड्डाणपुलाजवळ ट्रकने चिरडले होते. परिसरात अवजड वाहनांची मोठी गर्दी राहते. वाहनचालक निष्काळजीपणे वाहने चालवितात. अपघात घडल्यावर पोलीस सक्रीय होतात आणि पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते. पोलीस दुचाकी, लहान वाहनचालकांना त्रास देतात. परंतु अवजड वाहनांवर कारवाई होत नाही. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
चिमुकली बचावली
अपघाताच्या वेळी दोन वर्षाची रिद्धी आपल्या आईच्या कुशीत होती. ट्रकची धडक लागताच ती हवेत उसळुन ट्रकच्या दोन चाकाच्या मध्ये आली. तिच्या दोन्ही बाजुला ट्रकची चाके होती. थोड्या अंतरावर असल्यामुळे ती बालंबाल बचावली.