भरधाव कारने घेतला भावंडाचा बळी; हॉटेल व्यवसायिक रोहन अबॉटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:59 PM2021-02-08T18:59:56+5:302021-02-08T19:00:54+5:30
Hit And Run Case : अपघातानंतर पळून गेल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.
नवी मुंबई : पामबीच मार्गावरील हिट अँड रन प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी रोहन अबॉट याला अटक केली आहे. तो अबॉट हॉटेलचा व्यवस्थापक असून घटनेवेळी कार चालवत होता. अपघातानंतर पळून गेल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.
शनिवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर एपीएमसी हा भीषण अपघात घडला होता. भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अक्षय गवरे व संकेत गवरे या भावंडाचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र अपघातानंतर मर्सिडीज कार घटनास्थळीच सोडून चालकाने पळ काढला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कार चालकाचा शोध घेत होते.
अखेर सोमवारी सकाळी रोहन अबॉट याने स्वतःला एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केले. वाशीतील अबॉट हॉटेलचा तो व्यवस्थापक आहे. अपघातावेळी तो गाडीत एकटाच होता अशी कबुली त्याने दिल्याचे उपनिरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मयत अक्षय व संकेत हे टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निलेश गवरे यांची मुले आहेत. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.