आईचे लाखो रुपये नशेत उडवून आत्महत्येचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:48 AM2020-11-21T01:48:18+5:302020-11-21T01:49:14+5:30
आरेतील प्रकार : तरुणावर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आईचे बँकेतील लाखो रुपये नशा करण्यात उडविणाऱ्या तरुणाने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो फसल्याने जंगलात त्याला लुबाडून त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आल्याचा बनाव केला. मात्र ही बाब खोटी असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झाले आणि आरे पोलिसांनी त्याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल केला.
सोहन पाल असे या तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाल खासगी कंपनीत काम करत असून त्याच्या वडिलांची पानाची टपरी आहे. त्याला नशेचे व्यसन होते. आईसोबत बँकेत त्याचे जॉइंट खाते असल्याने नशेसाठी त्याने त्यातील चार लाख रुपये हळूहळू काढून संपविले. आईला हे समजेल याची त्याला भीती होती. त्यामुळे अखेर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि आरेच्या युनिट क्रमांक ७ मध्ये जाऊन स्वतःचा गळा चिरला. मात्र अडीच तास उलटूनही त्याचा मृत्यू न झाल्याने अखेर मित्राला कुणीतरी आपल्यावर वार केल्याचे सांगत बाेलावून घेतले.
अनोळखी महिलेने हिप्नाेटाईज करीत मानेवर वार केला आणि पैसे घेऊन पळ काढला, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, सीसीटीव्ही फूटेज पडताळले. मात्र त्यात असे काही घडल्याचा पुरावा सापडला नाही. अखेर पोलिसांनी पालकडे कसून चौकशी केली आणि तो बनाव असल्याची कबुली त्याने दिली.