खळबळजनक! अभिनेत्रीच्या कपड्यांवर आढळले स्पर्म; आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणाला नवं वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:12 AM2023-05-29T11:12:24+5:302023-05-29T11:13:06+5:30
पोलीस आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणी आरोपी समर सिंह, संजय सिंह, संदीप सिंह आणि अरुण पांडे यांचे डिएनए नमुने घेऊन पुढील तपास करेल
लखनौ - वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. आकांक्षाच्या अचानक मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहिले ज्याची अद्याप उत्तरे सापडली नाहीत. कथितपणे अभिनेत्री आकांक्षाने आत्महत्या केल्याचं बोलले जाते परंतु अद्याप तिच्या मृत्यूचे गुढ उकलले नाही. या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. पण आता या प्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे.
घटनेच्या दिवशी अभिनेत्रीच्या अंगावर असलेल्या कपड्यांची तपासणी केली असता लॅबमधून त्याचा रिपोर्ट आला आहे. ज्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळेल. आकांक्षाच्या अंडरगारमेंट्सवर स्पर्म आढळले आहे. या खळबळजनक रिपोर्टनंतर आरोपी समर सिंह, संजय सिंह यांच्यासह ४ जणांची DNA चाचणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी याबाबत कोर्टात आरोपींच्या डिएनए चाचणीसाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
पोलीस आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणी आरोपी समर सिंह, संजय सिंह, संदीप सिंह आणि अरुण पांडे यांचे डिएनए नमुने घेऊन पुढील तपास करेल. समर सिंह आणि संजय सिंह हे अभिनेत्री आकांक्षा दुबे हिला आत्महत्येसाठी उकसावल्याचा आरोपाबद्दल जेलमध्ये आहेत. संदीप सिंहसोबत आकांक्षाला शेवटचे पाहिले गेले. आत्महत्येपूर्वी आकांक्षा एका पार्टीतून परतली होती.
कुटुंबाची एकच मागणी
याआधी वकील शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी करतो की आकांक्षा दुबे मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवावा. आकांक्षाच्या कुटुंबाला वाराणसी पोलिसांवर भरवसा नाही. गायक समर सिंहने आकांक्षाला त्रास दिला असा आरोप तिच्या आईचा आहे. त्याचसोबत आकांक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावाही कुटुंबाने केला आहे.
आकांक्षा दुबेचे चित्रपट
समर सिंह हा आकांक्षा दुबेच्या कथित आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहे. वाराणसी पोलीस आणि गाझियाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला अटक केली. २५ वर्षीय अभिनेत्री आकांक्षा दुबे २६ मार्च रोजी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. तिने 'कसम पैदा करने वाले की २', 'मुझसे शादी करोगी' आणि 'वीरोन'सह अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.